जळगाव, 29 सप्टेंबर: 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारीत मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 26 सप्टेंबर 2026 रोजीच्या पत्रान्वये वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. यानुषंगाने काल दि.28 सप्टेंबर 2026 रोजी विभागीय आयुक्त, नाशिक तथा मतदार यादी निरीक्षक नाशिक यांचे अध्यक्षतेखाली आज दुरदृष्यप्रणालीव्दारे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी रोहन घुगे, सह जिल्हाधिकारी योगेशकुमार मिना, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना मोरे उपस्थित होते.
- विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक:- दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट 2026 ते 12 ऑक्टोबर 2026, नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे 31 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी 16 नोव्हेंबर 2026 करण्यात येणार आहेत.
ज्या मतदारांनी गणनापत्रक BLO कडे जमा केलेले नाही, अशा 5 लाख 14 हजार 836 मतदारांची नावे 31 ऑगस्ट, 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असणार नाहीत. त्यात मयत मतदार 93 हजार 709, गैरहजर मतदार 35 हजार 808, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार 2 लाख 62 हजार 545, इतर मतदार 1 हजार 740, यापूर्वीच नोंदणी झालेले मतदार 61 हजार 34 असून एकूण 5 लाख 14 हजार 836 मतदार आहेत.
वरील पैकी मयत मतदार वगळता जळगाव जिल्ह्यातील एकही पात्र मतदार, मतदार यादी मध्ये नाव येण्यापासून वंचित राहू नये या उद्देशाने, प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या (ASDD मतदारांची यादी) व्यक्तीची नावे समाविष्ट न होण्याची संभाव्य कारणासह संबंधित मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी याचे कार्यालय तसेच जिल्ह्याचे jalgaon.gov.in या संकेतस्थळावर अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दावे, हरकती दाखल करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट, 2026 ते 12 ऑक्टोंबर, 2026
प्रारुप मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट नसलेले मतदार किंवा 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण केलेले नवमतदार यांना या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा नमुना 8 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरु शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरुन हरकत घेऊ शकेल. सदर सर्व अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहेत.
मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारण करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती 1 वर्षापर्यतीची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. दावे व हरकती दाखल करतांना एकगठ्ठ पध्दतीने अर्ज दाखल करता येणार नाही.
केवळ वैयक्तिक दावे/हरकती स्वीकाराले जातील. कोणत्याही व्यक्ती/संस्थेने एकत्रितपणे सादर केलेले दावे आणि हरकती विचारात घेतले जाणार नाहीत. परंतू एकाच घरातील, म्हणजेच एकाच कुटुंबातील सदस्यांशी संबंधित, एकत्रितपणे सादर केलेले वैयक्तिक दावे / हरकती स्वीकारले जाऊ शकतात.
दावे/हरकती दाखल करण्याच्या कालावधीत प्राप्त होणा-या विविध नमुना ६, ७, ८, च्या अर्जाचा तपशिल अनुक्रमे नमुना ९, १०, ११, मध्ये तयार करुन कार्यालयाचे सूचना फलकावर प्रसिध्द करतील तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांसमवेत मतदार नोंदणी अधिकारी प्रत्येक आठवडयाला सामायिक करतील
नोटीस टप्पा दावे व हरकती निकाली काढणे 31 ऑगस्ट, 2026 ते दि. 10 नोव्हेंबर, 2026
प्रारुप यादी प्रसिद्धीनंतर,ज्या मतदारांची नावे मागील मतदार यादीतील नोंदीशी जुळत नाहीत किंवा जुळणी प्रक्रियेत विसंगती आढळली आहे, अशा मतदारांना मतदार नोंदणी अधिका-यामार्फत नोटिसा बजावल्या जातील व कागदपत्र पडताळणी अंतीअंती निर्णय घेण्यात येईल.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २४ अंतर्गत अपिल करण्याची तरतूद आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २४(अ) अन्वये जिल्हा दंडाधिका-याकडे/जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल आणि दुसरे अपील कलम २४(ब) नुसार, पहिल्या अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध, मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम २७ अन्वये विहित केलेल्या पद्धतीने मुख्य निवडणूक अधिकारी याचे कडे (CEO)अपिल दाखल करता येईल.
मा.भारत निवडणूक आयोगातर्फे मतदारासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO ना कॉल करण्यासाठी Book a call With BLO ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ECINET हे App download करुन सदर अॅप मधील Book a call With BLO या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येते.
अंतिम मतदार यादी प्रसिध्दी बाबत- दिनांक 31 ऑगस्ट, 2026 ते दि. 10 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत नोटिसांबाबतची कार्यवाही तसेच प्राप्त दावे व हरकती निकालात काढण्यातबाबतची कार्यवाही करण्यात येईल व तदनंतर अंतिम मतदार यादी दिनांक 16 नोव्हेबर, 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक, नाशिक श्री.गेडाम यांनी आवाहन केले आहे की, “जळगाव जिल्ह्यातील सर्व पात्र मतदार आणि Uncollectable वर्गवारीतील नागरिकांनी ३१ ऑगस्ट, २०२६ ते १२ ऑक्टोंबर २०२६ दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आपले दावे/हरकती दाखल करावी. तसेच ०१ ऑक्टोबर, २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी नमुना ६ (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे.”
या करीता आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तहसिल कार्यालयात संपर्क साधून नाव नोंदणी करीता नमुना 6 आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करावा किंवा https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर Online नाव नोंदणी करावी व “या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्यावा.” असे जाहीर आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
हेही वाचा: विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






