पॅरिस, 1 ऑगस्ट : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेने कांस्य पदक पटकावले आहे. दरम्यान, स्वप्निलच्या यशामुळे महाराष्ट्राने ऑलिम्पिकमध्ये तब्बल 72 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. यापुर्वी, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून इतिहास घडवला होता.
महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेला कांस्य पदक –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये स्वप्निल कुसाळे याने ‘कांस्य’ पदकावर आपली मोहर उमटवली. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन यामध्ये तीन प्रकारे नेमबाजी करावी लागते. पहिल्या प्रकारात गुडघे टिकण्याच्या स्थितीतून गुणांची कमाई करावी लागते. यानंतर प्रोन पद्धतीत अचूक लक्ष्यभेद करावा लागतो. अखेर, उभे राहून गुणांची कमाई करावी लागते. या तीनही प्रकारत स्वप्निलने अचूक कामगिरी करत कास्यं पदकावर आपलं नाव कोरले.
स्वप्निलची ऐतिहासिक कामगिरी –
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून इतिहास घडवला होता. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील स्वप्नीलने यशाला गवसणी घालत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. स्वप्निलच्या अथक प्रयत्नांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश आले आणि तब्बल 72 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.
पदक जिंकल्यानंतर स्वप्निल काय म्हणाला? –
पदक जिंकल्यानंतर स्वप्निल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, मला ज्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत त्या सर्वांचे आभार मानतो. सामन्यात प्रेशरपेक्षा भारतासाठी कायतरी करायचं हेच मनात सुरु होते. त्यासाठी तशीच मेहनत घेतली. माझं लक्ष फक्त ध्येयाकडे होते. दरम्यान, कितीही प्रेशर असले तरी धोनी मैदानात एकदम शांत असतो. त्याच्याकडून मला प्रेरणा मिळाली असून रायफल शूटिंग सामन्यातही मी शांत होतो. माझे लक्ष्य फक्त ध्येयाकडे होते, असे म्हणत त्याने महेंद्रसिंह धोनीचा शांतपणा अंगिकारला असल्याचे सांगितले.
हेही वाचा : जळगाव-पाचोरा रोडवरील वावडदे नजीक लक्झरी व डंपरमध्ये मोठा अपघात; प्रवासी जखमी, नेमकं काय घडलं?