जळगाव, 26 एप्रिल : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या वक्तव्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. गेल्या 10 वर्षे संपूर्ण बहुमताचे सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपवू शकले नाही?, असा सवालही रोहिणी खडसेंनी उपस्थित केलाय.
पियुष गोयल यांच्या वक्तव्यावरून रोहिणी खडसेंनी केली राजीनाम्याची मागणी –
जोपर्यंत देशातील 140 कोटी नागरिक देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला धर्म मानता नाही, तोपर्यंत अशा गोष्टी (पहलगाम हल्ला) होत राहतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले. यावरून रोहिणी खडसेंनी पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या? –
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या वक्तव्य ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करत रोहिणी खडसेंनी सरकारविरोधात सवाल उपस्थित केले. त्यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलंय की, केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणतात की, जनतेच्या चुकीमुळे हल्ला झाला.
हल्ला झाला तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती? सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? गेल्या 10 वर्षे संपूर्ण बहुमताचे सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपवू शकले नाही ? या प्रश्नांचे उत्तर तर मिळालेच नाही. उलट आता केंद्रीय मंत्री सामान्य जनतेवर खापर फोडत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. खरंतर यांचा राजीनामाच घ्यायला हवा, असे रोहिणी खडसेंनी म्हटलंय.
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश