पुणे, 29 जुलै : पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी आज त्यांच्या जामीनाबाबत सुनावणी पार पडली. दरम्यान, सुनावणीला सुरूवात होण्यापुर्वी पतीसाठी रोहिणी खडसे कोट घालून थेट न्यायालयात आल्याचे पाहायला मिळाले. स्वतःच्या पतीच्या सुनावणीसाठी वकिली पोशाख घालून रोहिणी न्यायालयात उभ्या राहिल्याची माहिती समोर आली आहे.
रोहिणी खडसे वकिली पोषाखात स्वतः कोर्ट रूममध्ये दाखल –
पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर सध्या पोलिसांच्या अटकेत असून या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी सुरू झाली. आज दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर खेवलकर यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पती प्रांजल यांची बाजू लढण्यासाठी रोहिणी खडसे या स्वत: वकील म्हणून न्यायालयात कोट घालून वकील म्हणून हजर राहिल्या. दरम्यान, खटल्याची सुनावणी संपल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे मी योग्य वेळी बोलेन, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी माध्यामांसोबत बोलताना दिली.
कोर्टाची निकाल येण्याची शक्यता –
पुणे ड्रग्स प्रकरणातील प्रांजल खेवलकर यांच्यासह सातही आरोपींची पोलीस कोठडी आज संपली. हे प्रकरण समोर आल्यानंतर न्यायालयाकडून सदर प्रकरणातील आरोपींना मागे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, प्रांजल खेलवालकर आणि इतर सहा आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, आज न्यायालयात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला असून प्रांजल खेवलकर यांच्यासह सात आरोपींना जामीन मिळणार का? की त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार याबाबत लवकरच न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता आहे.