चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 24 ऑक्टोबर : राज्यात ग्रामीण भागातील तसेच ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची स्वतःची वेबसाइट तयार होणार असून, या माध्यमातून गावाचा इतिहास, संस्कृती आणि विकासकामांची माहिती थेट जगासमोर मांडली जाणार आहे. यामुळे आता ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाची माहिती सर्वांना कळणार आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा-खर्च आणि कारभार पूर्णपणे पारदर्शक होणार –
आतापर्यंत अनेक ग्रामपंचायतींनी वारंवार सूचना मिळूनही वेबसाइट विकसित करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, आता ग्रामविकास विभागाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत वेबसाइट कशा स्वरूपात आणि कोणत्या घटकांसह विकसित करायच्या याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या उपक्रमामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा-खर्च आणि कारभार पूर्णपणे पारदर्शक होणार आहे.
वेबसाइटवर असणार 13 प्रमुख घटक –
ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार, या वेबसाइटमध्ये एकूण 13 विभाग असतील. मुखपृष्ठ, ग्रामपंचायतीबद्दल माहिती, प्रमुख प्रकल्प व योजना, लाभार्थी तपशील, परिपत्रके, पायाभूत सुविधा, अर्थसंकल्प व पारदर्शकता, नागरिक सेवा, गावाची ओळख व संस्कृती, रोजगार व कौशल्य विकास, शिक्षण, युवक कोपरा तसेच तक्रार निवारण व फीडबॅक प्रणाली या माध्यमातून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार वेबसाईटवर दिसणार आहे.
वेबसाइट ठरणार ग्रामपंचायतीचा आरसा –
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध ग्रामविकास योजनांमधून मिळणाऱ्या निधीचा उपयोग कसा केला जातो, हे या वेबसाइटवर स्पष्टपणे पाहता येईल. त्यामुळे ग्रामपंचायतीचा विकास, पारदर्शकता आणि जबाबदारी दर्शविणारा ‘डिजिटल आरसा’ म्हणून प्रत्येक वेबसाइट कार्य करेल.
पुढील आठवड्यात वेबसाईट तयार करण्यासाठी कार्यवाही –
याबाबत जळगाव जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. यासाठी कार्यशाळा पार पडली असून प्रत्यक्षात ब्लॉक मॅनेजरला याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात वेबसाईट तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, शासनाच्या विविध विभागाच्या देखील वेबसाईट संबंधित ग्रामपंचायतींच्या वेबासाईटवर लिंक करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रत्येक तालुक्यातील गावाची वेबसाईटला देखील लिंक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे एखादा व्यक्ती जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरून गावापर्यंतच्या वेबसाईटवर पोहचू शकतो आणि सदरची माहिती जाणून घेऊ शकतो, अशी माहिती भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान –
राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले जात असून या अभियानाला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे आणि येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत ते चालणार आहे. यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर अव्वल येणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल 245 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि प्रधान सचिव यांनी या वेबसाइटबाबत सविस्तर सूचना केल्या आहेत.
हेही वाचा : भारतीय सैन्य दलात सज्ज होणार ’20 भैरव बटालियन’, नेमकी विशेषतः काय?






