नवी दिल्ली, 3 मे : उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असून पुढच्या आठ दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, असे विधान राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसोबत बोलताना केलं होतं. यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मंत्री महाजन यांच्यावर विखारी शब्दात टीका केलीय. पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजन हे भाजपने नेमलेला दलाल आहे. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही, असे राऊत म्हणाले आहेत.
View this post on Instagram
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, मुळात गिरीश महाजन यांचा पक्ष जागेवर आहे का? भ्रष्ट, ठेकेदार लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले असून त्यांच्या हातात पोलीस आहे तसेच पैसे आहे. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायला भाजपने जे दलाल नेमले आहेत, त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन होय.
दरम्यान, गिरीश महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही. आणि ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस हा गिरीश महाजन असेल, अशा विखारी शब्दात खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.