मुंबई, 12 ऑक्टोबर : देशभरात एकीकडे विजयादशमी हा सण साजरा होत असताना मुंबईत शिंदेंची शिवसेना तसेच ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर पार पडत असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यावर राज्यसभा खासदार तथा ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. “नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर मोदींचे सर्व गुलाम, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्रावर जोरदार टीका केलीय.
काय म्हणाले संजय राऊत?-
संजय राऊत राऊत म्हणाले की, ही देवाची आळंदी आहे. चोरांची आळंदीचा मेळावा आझाद मैदानावर भरला आहे. नाव आझाद आणि व्यासपीठावर मोदींचे सर्व गुलाम, नावाची जरी लाज राखा. या मेळाव्याला 50-55 वर्षे झाली. तिकडे आझाद मैदानावर. त्यांना मेळावा म्हणजे सुरतला गुजरातला घ्यायला हवा. सुरतच्या गर्भातून त्यांच्या सरकारचा जन्म झाला. सुरत जन्मस्थान आहे, हे आम्ही त्यांना आमचं सरकार आल्यावर सांगू.
तत्पुर्वी, दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे आपण शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पहिले भाषण केले. शिवसेनेच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. इतकंच सांगेन की, हा महाराष्ट्र आपल्याकडे फार मोठ्या आशेन पाहत आहे. हा महाराष्ट्र ठाकरेंच्या तीन पिढ्यांच्या मागे उभा राहिला आहे. मशालीसारखं चिन्ह या जगात कोणतं नाही, असं मी मानतो. आपण येण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे भाषण झालं. त्यांच्या भाषणानं महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. आपली निशाणी मशाल आहे. आता शस्त्रपूजन झाले. या देशात अनेक शस्त्रे आहेत. सकाळी नागपूरलाही शस्त्रपूजा झाली आता त्यात मशाल आली आहे. मशालीला आता शस्त्राचा दर्जा द्यावा लागेल.
रतन टाटा यांच्याबाबत काय म्हणाले? –
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, हा निष्ठावंतांचा महाराष्ट्राचा आहे. स्वाभिमानांचा हा महाराष्ट्र आहे. दोन दिवसांपूर्वी देशाचे सुपूत्र रतन टाटा यांचे निधन झाले. उद्योगपती गेल्यावर देश रडत नाही. पण टाटा गेल्यावर देश हळहळला. रडला. याचे कारण असे की, गेल्या अनेक वर्षांपासून टाटा म्हणजे विश्वास. विश्वासाचं दुसरं नाव टाटासोबत ठाकरे हेसुद्धा आहे.
ईव्हीएमचा घोटाळ्याशिवाय हे शक्य नाही –
संजय राऊत पुढे म्हणाले की, हा दसरा मेळावा नसून विजय मेळावा आहे आणि दोन महिन्यांनी आपल्याला विजय मेळावा घ्यायचा आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. उद्धवसाहेब तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्त्व करावं लागेल. हरयाणात निकाल लागला आणि महाराष्ट्रात पेढे वाटले जात आहेत. हरयाणाचे निकाल मजेशीर आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. काँग्रेसला 72 जागा होत्या आणि 12 वाजता भाजपने सरकार बनवलं. हा चमत्कार कसा झाला, भाजपने 39.9 टक्के मते मिळाली आहेत आणि काँग्रेस 39.3 मते मिळाली आहे. फक्ते 0.6 टक्क्यांचा फरक आहे. यामुळे भाजपचे 30 जागांचा फायदा झाला, ही गोष्ट कुणाच्याही कल्पनेत बसणारी नाही. हा ईव्हीएमचा घोटाळ्याशिवाय शक्य नाही, असा आरोप राऊतांनी केलाय. पण हरयाणात जे घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
राज्याची सूत्रे आपल्या उद्धव ठाकरेंकडे द्यावे लागतील –
काही लोकं या राज्यात महाराष्ट्र लुटण्यासाठी आले आहेत. ही लूट थांबवायची असेल तर या राज्याची सूत्रे आपल्या उद्धव ठाकरेंकडे द्यावे लागतील आणि महाराष्ट्र वाचवावा लागेल. महाराष्ट्राचा कारभार कसा कसा चालू आहे, यावर ते म्हणाले की, हा कावळ्यांकडे दिला कारभार त्याने हगून भरला दरबार अशी घाण या लोकांनी महाराष्ट्रात केली, या शब्दात त्यांनी टीका केली.
गौतम अदानींवर टीका –
गुजरातला इतिहास नाही आणि ते महाराष्ट्राचा भूगोल बदलायला निघाले आहेत. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली 256 मिठागाराची रक्कम गौतम अडाणीच्या घशात घातली. महाराष्ट्रातल्या पैशांवर गुजरातला सोन्याने मढवले जात आहे. मुंबई न्यायचे प्रयत्न चालू आहेत. विनोभा भावे यांची फार सुंदर घोषणा होती. त्यांनी भूदानाची चळवळ सुरू केली. ते म्हणायचे, सब भूमी गोपालकी. आज नरेंद्र मोदी म्हणतात की, सब भूमी गौतम अदानी की. माझ्याकडे यादी आहे, परवा चंद्रशेखर बावनकुळेंना 50 कोटींचा भूखंड 1 कोटींना दिला. हे सर्व का होत आहे, कारण या देशातील न्यायव्यवस्था विकली गेली आहे.
देशातील विकत गेलेली न्यायव्यवस्था जबाबदार –
आमच्या आमदार अपात्रतेचा प्रश्न शिल्लक आहे. चंद्रचूड साहेब यांचे काल मी एक निवेदन ऐकले की, सरन्यायाधीश म्हणून जेव्हा देशाची सेवा मी चोख बजावत आहोत, पहाटेपासून काम केल्याने समाधानाने झोपत आहोत, इतिहास माझ्या कार्यकालाचे कसे मूल्यमापन करणार, याची मला चिंता आहे. सरन्यायाधीश साहेब आपण या महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार बसवले आहे, ते पाहता आपल्याला झोप कशी लागते, असा प्रश्न आम्हाला पडतो. या राज्यातील देशातील भ्रष्टाचार जो झालेला आहे, त्याला देशातील विकत गेलेली न्यायव्यवस्था जबाबदार आहे. आता आपल्याला हे सगळं आता नष्ट करायचे असेल, तर मशाल हातात घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल आणि हा महाराष्ट्र वैभवशाली करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्य निर्माण करावे लागेल.