चंद्रपूर, 23 फेब्रुवारी : ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, हे विदर्भातील एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. विदर्भातील एका तरुणाची रशिया या देशात आयोजित जागतिक युवा महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. संकेत जनार्दन गव्हाळे असे या तरुणाचे नाव आहे. जागतिक युवा महोत्सवासाठी निवड झाल्यानंतर “सुवर्ण खान्देश लाईव्ह”च्या टीमने त्याच्याशी विशेष संवाद साधला.
संकेत जनार्दन गव्हाळे हा तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रामपूर गावातील रहिवासी आहे. सध्या तो दिल्लीत केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात कार्यरत आहे. संकेत हा युवक रशियामध्ये 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या जागतिक युवा महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या या सहभागाने चंद्रपूरसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विश्व युवा महोत्सवात करणार प्रतिनिधित्व –
माहिती आणि प्रसारण मंत्रालयात कार्यरत असलेला संकेत हा माजी राष्ट्रीय खेळाडू आणि एनसीसी (NCC) कॅडेट राहिलेला आहे. एनसीसीमध्ये त्याने राष्ट्रसेवा आणि शिस्तीचे महत्त्व जाणून घेतले. इंडियन नेव्हल वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर (INWTC), मुंबई येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि राष्ट्रीय नौकानयन शिबिरात सहभागी नोंदविला होता.
यानंतर संकेतने देशात पत्रकारितेच्या शिक्षणासाठी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय जन संचार (आयआयएमसी) संस्थेत शिक्षण घेतले. आयआयएमसीमध्ये असताना संकेतला त्याच्या ‘द स्कूल ऑफ नेचर’ या लघुपटासाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले होते.
रशियात आयोजित जागतिक युवा महोत्सवात त्याला भारतीय सांस्कृतिक वारसा आणि मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार आहे. संकेतला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याचा गौरव वाटत असल्याचे त्याने सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना सांगितले. तसेच या संधीमुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी संकेतने त्याचे पालक आणि आयआयएमसीच्या शिक्षकांचे आभार मानले.