चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर, 9 डिसेंबर : संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिखर समितीकडून मान्यता मिळताच उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे –
विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यावेळी म्हणाले की, 2018 पासून या मंदिराला एकही रुपया मिळालेला नाही. जे पैसे मिळाले होते, ते पैसे खर्च झाले आणि आज हे मंदिर कळसाविना आहे. या मंदिराला मुख्यमंत्री यांच्या समितीने 25 कोटी रुपयांची मंजूरी दिली होती. त्यामुळे या मंदिराच्या विकासासाठी ताबडतोब निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच 2015 मध्ये पहिल्यांदा या मंदिरासाठी प्राथमिक स्वरुपाचा विकास आराखडा तयार केला होता. त्यामुळे त्याठिकाणी तीर्थक्षेत्र, पर्यटन, तसेच सर्वांगिण विकासाची मागणीही त्यांनी यावेळी केली.
त्यावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शिखर समितीकडे पाठविण्यात आला असल्याचे मंत्री गोरे यांनी दिले.
संत मुक्ताई मंदिर विकासासाठी सुरुवातीला 9.8 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर निधी वितरित करण्यात आला असून त्या कामांना सुरुवातही झाली आहे. कामास गती न मिळाल्याने खर्चात वाढ झाली असल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
तसेच मंत्री गोरे म्हणाले की, पूर्वी शासनाने 25 कोटींच्या आराखड्यालाच मान्यता दिली होती. परंतु आता बांधकाम विभागाने तयार केलेल्या नव्या विकास आराखड्याला शिखर समितीच्या मान्यतेनंतरच पुढील उर्वरित मंदिराचे काम होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.






