जळगाव, 20 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील कळमसरा आणि रावेर तालुक्यातील परसाडे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अपात्र केल्याचे प्रकरण समोर असताना अजून एक सरपंच अपात्र केल्याची बातमी समोर आली आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुकच्या ग्रामपंचायत सरपंचांनी ठरलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे.
नेमकं प्रकरण काय? –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निंभोरा बुद्रुकच्या ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन सुरेश महाले यांना ठरलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र केले आहे. सचिन महाले यांच्याविरोधात संदीप तुकाराम महाले यांनी तक्रार दाखल केली होती. या ग्रामपंचायतीच्या 2021 मध्ये निवडणुका झाल्या. महाले हे अनुसूचित जाती जमाती (एसटी) संवर्गातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. दरम्यान, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर महाले यांची सरपंचपदी वर्णी लागली. 16 फेब्रुवारी 2021 पासून ते सरपंच असताना त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते.
जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविले अपात्र –
सचिन महाले यांना सदस्य म्हणून अपात्र ठरवावे, यासाठी संदीप महाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी रावेर तहसीलदारांनी व गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. दरम्यान, त्या अहवालात महाले यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे स्पष्ट केले. तक्रारदाराच्या वतीने अॅड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.
जिल्हाधिकाऱ्यांना अपात्र केल्याची कारवाई –
सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोन ग्रामपंचायतील सरपंच यांना अपात्र केल्याच्या कारवाई नुकतीच केली होती. यामध्ये पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविले. तर दुसरीकडे यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच मीना राजू तडवी यांना अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत