नंदुरबार, 1 मार्च : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या रांगामध्ये असलेले आदिवासी बांधव हे होळी मोठ्या उत्साहात साजरा करतात. सातपुडा परिसरात या होळी सणाला खूप महत्त्व दिले जाते म्हणूनच एक महिना आधीपासून माघ पौर्णिमेच्या या परिसरातील होळीची तयारी सुरु होते.
होळी सणाचा नवस –
होळीचा नवस करणारे मोरखी, यांच्याकडून एक महिना किंवा दोन, तीन महिने नियमांचे पालन करावे लागते. या सातपुडा परिसरातील आदिवासी बांधव आपल्या कुटूंबासह आणि गावाच्या कल्याण होवो, रोगराई, नेसर्गिक संकटातून मुक्त व्हावे म्हणून आपल्या कुलदेवताला नवस करत असतात. त्यामुळे यालाच आदिवासी भाषेत (मानता) असे म्हणतात. ही मानता पाळण्यासाठी कुटूंबातील पुरुष व्यक्ती गावपुजारी यांच्या सांगण्यावरून मोरखी, बावा, बुध्या, नागरामोरखी, धाणका डोको, अशी वेगवेगळे रूपे घेऊन या होळी सणाला आपला नवस फेडत असतात.
गावातील कारागीर कडक नियमांचे पालन करून (पालनी) करून घराबाहेर राहून गुरे, ढोरे, घरातील व्यक्ती, धान्य यांचे निगा राखावी, म्हणून कडक नियमांचे पालन करत असतात. आदिवासी परिसरातील ही होळीपारंपारिक ढोल, ताशे, वाद्य, पावी, रूढी, परंपरा, रितिरिवाजाप्रमाणे साजरा केली जात असते. यावर्षी या होळीच्या सणाला उद्यापासून म्हणजेच 2 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
असा असेल होळी उत्सवाचा कार्यक्रम –
2 मार्चला मानाची होळी मोरीराही येथील होळी पेटवून उत्सवाला सुरुवात
त्याचदिवशी पिपंलाबारी येथील होळीही होईल.
3 मार्चला तोडीकुंड, पाडली, काकरपाटी, अस्तंबा,
4 मार्चला मेवडी, पाडली, (लहान) रामसाला, गोवऱ्या,
5 मार्चला कालीबेल, उर्मिलामाळ, अस्तंबा,
6 मार्चला काठीची (राजवाडी) होळी, गादवाणी, सुरवाणी
7 मार्चला मोलगी, तलाई, खर्डा,
8 मार्चला असली, जामली,
9 मार्चला जमाना, वरखेडी, धनाजे,
10 मार्चला शेवटची होळी म्हणजे बुगवाडा होळी आणि उत्सवाचा समारोप
गुजरात, बारडोली, नवसारी, सुरत, पालेज, भरूच, अंकलेश्वर, नाशिक, पंढरपूर, पुणे आणि इतर ठिकाणी कामासाठी, रोजगारासाठी स्थलांतरीत झालेली कुटुंब मार्च महिन्यात होळी पाहण्यासाठी गावात येत असतात. मोरखी म्हणजे डोक्यावर मोराचे पिसाचे मुकुट आणि कंबरेला घुंगरू बांधलेले असते. तर बावा, बुद्या म्हणजे जे डोक्यावर बांबूपासून टोपीला रंगीबेरंगी कागदाच्या तुकडे चिकटून टोपीला डोक्यवर घालतात. तसेच कमरेला भोपळा, दुदी डोवे, बांधलेले असते.
SPECIAL STORY : शेतकऱ्याच्या पोरीनं नाव कमावलं! नंदुरबारच्या मेघानं मिळवलं विद्यापीठात Gold Medal
याशिवाय नागरामोरखी, धाणका डोको इत्यादी पेहेराव करून नाचणारे व्यक्ती असतात. मानता करणाऱ्यांना होळीच्या महिन्याच्या सुरुवातीलाच काही नियम पाळणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांना घराबाहेर राहावे लागते. खाटेवर न बसणे, झोपणे, स्रियांना स्पर्श न करणे, पायात चप्पल न घालणे, यासारख्या अनेक नियमे पालन करावे लागते. तसेच गावातील होळीभोवती रात्रभर गीत गात ढोल ताशे वाजत नाचतात.
शेवटच्या दिवशी होळीत सर्व मोरखीसह आणि ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील, गावातील लोक रात्रभर नाचतात. पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास होळीची पूजा करून पेटवली जाते. गावातील पोलीस पाटील यांच्या घरी बैठक घेऊन पूर्ण गावात मोरखी फिरतात आणि तेथून गावातील नदीच्या ठिकाणी सर्व मोरखीसह विविध पाड्यातील लोक एकत्र येऊन आंघोळ करून हे वृत (पालनी) संपते.
होळीच्या या उत्सवादरम्यान, आदिवासी बांधवांमध्ये आनंदाला आधाण आलेले असते. आदिवासी मुली आणि स्त्रिया पारंपारिक चांदीचे दागिने अंगावर घालत असतात. तसेच आनंदाने रात्री केहेदेख आली वा ओली बाय, मोकसो वाटे देख आली वा ओली बाय, डोगु देख आली वा ओली बाय परदेसुमे, ओली बाय झलकेवा, ओलीबाय ओलीबाय नाकुमे सोना मोत्यावा, याप्रकारचे पारंपारिक होळीगीत गात असतात.
ओली बाय म्हणजे होळी या देवतेचे रूप धारण करून हळूहळू झळकते आहे. तिने नाकात सोन्या मोत्याचे नथणी तर गळ्यात चांदीची हार घातला असतो. अशाप्रकारे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा परिसरात होळी सण हा मोठ्या संख्येने उत्साहात साजरा केला जातो.