चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 23 मे : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये प्रवासी बोट बुडून 5 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगरमधील प्रवरा नदीत काही जण बुडाले असता त्यांचा शोध घेण्यासाठी नदीत उतरलेली एसडीआरएफची बोटही उलटली. या धक्कादायक घटनेत एसडीआरएफ पथकाचे तीन जवान शहीद झाले आहेत. या तिघांमध्ये जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील एका जवानाचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अहमदनगरमधील प्रवरा नदीत दोन जण बुडाले होते. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याला शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, एसडीआरएफची बोट शोधकार्य सुरु असताना अचानक उलटली. या बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक नागरिक बुडाला. या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तातुक्यातील सुगावमध्ये ही घटना घडली.
तीन जवान शहीद –
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले तीन जवान काल 22 मे रोजी धुळे येथून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव येथे बचाव कार्यासाठी गेले होते. दरम्यान, आज सकाळी शोध आणि बचाव कार्य सुरू असताना त्यांची बोट पलटली आणि त्यामध्ये तीन जवान शहीद झाले. या तीन शहीद झालेल्या जवांनामध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका जवानाचा समावेश आहे.
शहीद झालेल्या जवानांची नावे –
1. प्रकाश नाना शिंदे – पोलीस उपनिरीक्षक (पत्ता – मु. पो. कौठडी, ता. दौंड, जिल्हा. पुणे)
2. वैभव सुनिल वाघ – पोलीस शिपाई – (पत्ता – मु. पांढरद, पोस्ट – पिचर्डे, ता. भडगाव, जिल्हा. जळगाव)
3. राहुल गोपीचंद पावरा – पोलीस शिपाई (पत्ता – मु. नांदर्डे, पोस्ट – वासडी, ता. शिरपूर, धुळे)
हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी