पाचोरा, 02 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माईसाहेब रूक्मिणी सातारकर यांचे निधन झाले. मुंबईतील नेरुळमध्ये त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बाबा महाराज सातारकरांना दिली मोलाची साथ –
अध्यात्माच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी बाबा महाराजांसोबत त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. बाबा महाराज सातारकर यांनी 1983 पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले.
त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली आहे. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. बाबा महाराज सातारकर यांच्या धार्मिक कार्यात त्यांच्या पत्नी रुक्मिणी उर्फ माईसाहेब यांचीही मोलाची साथ होती.
गेल्या अनेक दशकांपासून बाबा महाराज यांच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. बाबा महाराज सातारकर यांचे इंग्रजी माध्यमात एसएससीपर्यंत शिक्षण झाले आहे. ते वयाच्या आठव्या वर्षांपासून किर्तनात अभंगाच्या चाली म्हणायचे. अध्यात्माच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी बाबा महाराजांसोबत रूक्मिणी सातारकर त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त केला जात आहे.