चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई : खान्देशच्या राजकारणातून एक एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून खान्देशच्या राजकारणात ज्यांना अत्यंत मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे, असे सुरेशदादा जैन यांनी राजकारणातून सक्रिय निवृत्त घेतली आहे. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात होते. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पाठवला आहे.
उद्धव ठाकरेंना पत्रात काय लिहिलं –
सुरेशदादा जैन यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली. पत्रात त्यांनी लिहिले की, युवावस्थेत म्हणजेच 1974 पासून (40 वर्ष) मी राजकारणात सहभाग घेत आलो आहे. 1980 पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केला. 34 वर्ष मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केले आणि हिंदूहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून शिवसेनेच्या माध्यमातून मला जनतेच्या सेवेसाठी सर्वप्रथम मंत्रीपद देऊन मी करीत असलेल्या चांगल्या कामाची पावती दिली. 2014 नंतर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणामुळे मी हळूहळू सक्रीय राजकारणातून बाहेर पडलो.
आता आयुष्याच्या या अंतिम टप्प्यात सक्रीय राजकारणात कोणताही भाग न घेता निवृत्त व्हायचे ठरवले आहे. म्हणून मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा सादर करीत आहे. तो मान्य करण्यात यावा, ही विनंती. यानंतर जो कुणी, जिल्ह्याचा, शहराचा, राज्याचा, देशाच्या विकासाचे व्हिजन घेऊन काम करीत असेल त्या सर्वांसाठी मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहील.
आपण स्वत: तसेच सर्व शिवसेना आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे कोटींच्या संख्येत असलेले शिवसैनिकांनी जे मला स्नेह दिले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या प्रेमात राहू इच्छितो. आदरणीय बाळासाहेबांचे आशिर्वाद पाठीशी होते आणि राहतील, असे सुरेशदादा जैन यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
सलग सात वेळा आमदार, नऊ वेळा नगराध्यक्ष आणि एकदा राज्यमंत्री राहिलेल्या सुरेशदादा जैन यांनी आता सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून सुरेशदादा जैन यांची ओळख आहे.