ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील मौजे शेवाळे येथील गट क्रमांक 255/1/अ मधून जाणाऱ्या रस्त्याच्या वाहिवाट संदर्भातील वादावर आज लोकअदालतीच्या माध्यमातून तहसिलदार विजय बनसोडे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड झाली. यामुळे अडवलेला शेतामधील रस्ता आता पुन्हा मोकळा करण्यात आला असून, शेतजमिनीची मोजणी लवकरच होणार आहे.
नेमकं प्रकरण काय? –
सदर प्रकरणात अर्जदार विश्वास बाबुराव पाटील यांनी मामलेदार न्यायालयात कलम 5 अंतर्गत वाहिवाट दावा क्र. 26/2025 दाखल केला होता. आधी 31 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्ष तडजोडीस तयार असल्याचे स्पष्ट झाल्याने आज दिनांक 06 ऑगस्ट रोजी तहसिलदार विजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष ठिकाणी लोकअदालत घेण्यात आली.
लोकअदालतीत ठरलेले मुद्दे –
- सामनेवाले गणेश पाटील यांच्या शेतातून पश्चिमेकडे जाणारा रस्ता पूर्ववत सुरू ठेवण्यात येईल.
- अर्जदार राजघर भगा पाटील यांच्या शेतास लागून असलेल्या ठिकाणी मोजणीची खूण रोवली जाईल.
- रस्ता त्या खुणेच्या पश्चिम बाजूने पुढे दक्षिणेकडे वळवण्यात येणार.
- दोन्ही पक्षांनी त्यांच्या शेतजमिनीची मोजणी स्वखर्चाने लवकरात लवकर करून घ्यावी.
- तोपर्यंत सध्याचा रस्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मोकळा ठेवण्यात यावा, अशी स्पष्ट अट ठेवण्यात आली.
- अडवलेला रस्ता खड्डे बुजवून खुला करण्यात आला.
ही कारवाई तहसिलदार विजय बनसोडे तसेच गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, वकील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. दरम्यान, लोकअदालतीद्वारे वाद मिटल्यामुळे दोन्ही पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा : उत्तराखंड ढगफुटी: जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित, जिल्हा प्रशासनाची तत्परता