चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे काम 10 वर्षांपासून करत आहेत, हे मी मान्य करतो. पण मला विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत जाऊन यंदाच्या वर्षी 56 वर्ष पूर्ण होतील. आज या देशामध्ये सतत 56 वर्षे निवडून येणारा एक माणूस दाखवा, या शब्दात शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष राहणार नाही आणि त्यामुळे लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्लान आहे. तसेच शरद पवार पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते झोपत होते का, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टिकेनंतर आता शरद पवार यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले शरद पवार –
नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सध्या जे बोलत आहेत. त्यातील 1 टक्कासुद्धा खरं नाही. आपण जेव्हा देश चालवायचा असेल, त्यावेळी जाती धर्माचा विचार करुन देश चालवता येईल? असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यामुळे धर्म, जातीच्या नावावर डायव्हर्ट केले जात आहे, असेही ते म्हणाले.
इस्रायलचा तो किस्सा –
ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे. एकावेळी तर असं झालं की, मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला. अमेरिकेने त्यावेळी त्यांचा व्हिसा नाकारला होता. त्यांनी सांगितलं, मला इस्रायलला जाऊन तिथे अभ्यास करायची तुमच्याबरोबर इच्छा आहे. मी तिथे त्यांना घेऊन गेलो. इस्रायलमध्ये कृषीविषयक तंत्रज्ञान या सर्व गोष्टी त्यांना सविस्तरपणानं 4 दिवस दाखवल्या आणि हे सगळं माहिती असताना हल्ली ते जे बोलतात, ते माझ्या मते राजकारण आहे. दुसरं काही नाही. ते मुख्यमंत्री होते, त्या राज्याच्या विकासात त्यांना विशेष आवड होती. आता त्यांची विशेष आवड हे राजकारण आहे, या शब्दात त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
….हे काही शहाणपणाचं लक्षण नाही –
नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत रोड शो केला. यावर शरद पवार म्हणाले की, मुंबईसारख्या शहरात रोड शो वगैरे आयोजित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं आणि त्यांनी जो कार्यक्रम ज्या भागात घेतला, तो गुजराथी भाग आहे. मला काही समजत नाही, त्यांना रोड शो करायचा असेल तर मुंबईत मोठे रस्ता असलेला भाग होता पण त्यांचं लक्ष एका वर्गाकडे होतं आणि त्याचा लोकांना त्रास झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच शिवसैनिक हा शिंदेंनी वेगवेगळा केला पण शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे, असेही ते म्हणाले. तर राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय स्थान आहे, मला माहिती नाही, या शब्दात त्यांनी राज ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.