वाशिम, 19 मे : राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे सावट असून ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. वाशिम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अचानक आलेल्या पावसात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले भुईमूग, हरभरा, तूर आणि मूग पाण्याबरोबर वाहून गेले. दरम्यान, डोळ्यांसमोर वाहून जात असलेल्या भुईमूगाच्या शेंगा वाचविण्यासाठी शेतकऱ्याने धडपड केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओची दखल केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी घेतली.
नेमकी बातमी काय? –
वाशीम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी रब्बी हंगामीतील माल विक्रीसाठी आणला होता. अशातच 15 मे रोजी संध्याकाळी अचानकच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले भुईमूग, हरभरा, तूर आणि मूग पाण्याबरोबर वाहून गेले. दरम्यान, याठिकाणी असलेल्या गौरव उर्फ इंदल पवार नावाच्या शेतकऱ्याने आपल्या डोळ्यासमोर वाहून जात असलेल्या शेंगा वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र, मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्याचे नुकसान झाले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल –
डोळ्यांसमोर वाहून जात असलेल्या शेंगा वाचवताणाचा शेतकरी गौरव पवार यांचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गौरव पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेला आपला माल वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. ते अक्षरशः जमिनीवर झोपून, पूर्ण ताकदीनं शेंगा गोळा करत होते. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की, त्याच्या डोळ्यांसमोर त्याची मेहनत वाहून गेली. परिणामी ते काहीच करू शकला नाही. याबाबतच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
…अन् केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल –
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत शेतकरी गौरव पवार यांना फोन कॉल केला. कृषीमंत्री चौहान म्हणाले की, मला हा व्हिडिओ पाहून खूपच वाईट वाटले. पण तुम्ही चिंता करु नका. कारण, महाराष्ट्राचे सरकार खूपच संवेदनशील आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली. दरम्यान, तुमच्या मालाचं बाजार समितीत नुकसान झालेले आहे, त्यामुळे तुम्हाला याची नुकसान भरपाई जरुर मिळेल, असे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी शेतकरी गौरव पवार यांना दिलंय.