चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 21 डिसेंबर : राज्यात नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर करण्यात आला असून महायुतीला मोठ्या प्रमाणात विजय मिळालाय. दरम्यान, राज्यातील चर्चेत असलेल्या पाचोरा-भडगाव मतदारसंघात पाचोरा तसेच भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने अभूतपुर्व विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पत्नी सुनिताताई पाटील यांनी तर भडगावमध्ये रेखा मालचे यांनी नगराध्यक्षपदासाठी विजय मिळवलाय.
पाचोऱ्यात सुनिताताई पाटील दुसऱ्यांदा नगराध्यक्ष –
पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना विरूद्ध भाजप अशी थेट लढत असल्याने चुरस निर्माण झाली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सुनिताताई पाटील तर भाजपकडून सुचेताताई वाघ या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यामध्ये सुनिताताई पाटील 25 हजार 865 इतकी तर सुचेताताई वाघ 14 हजार 517 मते मिळाली. दरम्यान, सुनिताताई पाटील यांनी 11 हजार 348 मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळवलाय.
पाचोरा नगरपरिषद निवडणूक निकाल –
- शिवसेना – 22 जागा
- भाजप – 5 जागा
- इतर – 1 (भाजप पुरस्कृत)
विजयी नगराध्यक्ष-नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित –
पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षपदासाठी विजयी झालेल्या सुनिताताई पाटील तसेच विजयी नगरसेवक सुमित पाटील यांनी अर्चना मोरे यांच्याकडून विजयाचे प्रमाणपत्र स्विकारले. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे, तहसीलदार विजय बनसोडे, युवासेना नेत्या डॉ. प्रियंका पाटील, स्वीय सहायक राजेश पाटील, प्रविण पाटील, आदी उपस्थित होते.
भडगावमध्ये रेखा मालचे नगराध्यपदासाठी विजयी –
भडगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. यामध्ये शिवसेनेकडून रेखा मालचे तर भाजपकडून सुशिला पाटील या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. दरम्यान, रेखा मालचे यांना 12 हजार 955 इतकी तर सुशिला पाटील 11 हजार 444 यांना मते मिळाली. दरम्यान, रेखाई मालचे यांचा 1 हजार 511 मतांनी विजय झाल्याने भडगावमध्ये देखील शिवसेनेने बाजी मारली आहे.
भडगाव नगरपरिषद निवडणूक निकाल –
- शिवसेना – 19
- भाजप – 4
- इतर – 1






