ठाणे – महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांची तब्येत बरी नसल्याने साताऱ्यात त्यांच्या गावी गेले होते. त्यांना ताप आणि घशाचा संसर्ग झाला असल्याची माहिती एकनाथ शिंदेंच्या डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. यानंतर काल रविवारी ते ठाण्यात परतले. यानंतर आज शिवसेनेचे नेते संजय शिरसाठी यांनी एकनाथ शिंदे यांच्या तब्येत नेमकी कशी आहे, याबाबत माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.
काय म्हणाले शिवसेना नेते संजय शिरसाठ –
माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय शिरसाठ म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आलो होतो. तब्येतीची चौकशी करण्याचा माझा प्रयत्न होता. परंतु आता सध्या त्याठिकाणी डॉक्टर उपस्थित असून त्यांना एक डोस दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता आराम करत आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्णत: बेडरेस्टचा सल्ला दिला आहे. म्हणून ते आता कुणाचीही भेट घेणार नाहीत. कुणालाही भेटणारसुद्धा नाहीत, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कोण होणार?
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्यापही त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर संबंधित नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यासाठी भाजपचे दोन निरीक्षक मुंबईत दाखल होतील, यानंतर विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, हे दोन निरीक्षक नेमके कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता हे दोन निरीक्षक कोण असतील, त्यांची नावे समोर आली आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षक असणार आहोत. त्यांच्या निरीक्षणाखाली महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार आहे. भाजपचे हे दोन्ही जेष्ठ नेते मुंबईत दाखल होतील आणि यानंतर त्यांच्या निरीक्षणाखाली भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार आहे.
maharashtra politics : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण? हे दोन नेते ठरवणार, नावं जाहीर