मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. गृहखात्यावर विरोधकांच्या वतीने जोरदा टीका करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, अगदी एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते त्याठिकाणी गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून या महाराष्ट्रात गुंडांचा जो हैदोस सुरू आहे, असा हैदोस असं नाही की यापूर्वी महाराष्ट्रात झाला नव्हता. पण ते गँगवॉर दोन गँगमधील गँगवॉर होतं. आता मात्र, सरकारमध्ये गँगवॉर आलं आहे. ज्या पद्धतीने सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे, या गुंडांचे वेळोवेळी मंत्र्यांसोबतचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत, या गुड्यांना मिळणारे संरक्षण हा चितेंचा विषय आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत ते म्हणाले की, हे प्रकरण जेवढं वरकरणी वाटते आहे तितके सोपे नाही. सूडभावनेतून त्या गुंडाने तसं पाऊल उचललं असेल, मात्र, त्याने आत्महत्या का केली. हा प्रश्न मनात कायम राहतो. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, पण ते कोण झाडतंय, हे कळत नाही. काल मी काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. त्या मॉरिसकडे परवानाधारक शस्त्र नव्हतं. पण त्याच्या सुरक्षारक्षकाच्या शस्त्रातून त्याने गोळ्या चालवल्या. पण त्या गोळ्या खरंच त्याने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कुणीतरी दिली होती का, हा प्रश्न आहे.
कालच देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले. मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे कलंक, फडतूस हे फारच सौम्य शब्द झाले. पण निर्घृण आणि असं वाटायला लागलं आहे की, यांची मानसिक तपासणी करावी की काय, आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती. अत्यंत संतापनजक होती. फडणवीस जे बोलले की, उद्या एखाद्या गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू, मला वाटलं त्यांनी श्वान शब्द वापरला. नुसता संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. हा सुसंस्कृत नाही, हा निर्ढावलेला, निर्घृण मनाचा, अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे.
गृहमंत्री म्हटल्यावर राज्याच्या कुत्र्याच्या, सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमच्याकडेच येते. माणसांच्या जबाबदारीची तर एक वेगळीच बाब आहे. एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता, असा सवालही त्यांनी केला. तसेच हे सरकार बरखास्त करण्यात यावे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा – गोळीबार प्रकरणानंतर विरोधक आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीवर फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर