चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 7 मे : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली. दरम्यान, या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? –
उद्धव ठाकरे जाहीरसभेत बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षातील माणसे सत्तेत जातात. मात्र, करण पवार आणि उन्मेश पाटील यांचे मला कौतुक करावेसे वाटते. ते प्रवाहाच्या विरोधात पोहत जाऊन सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आले आहेत. म्हणून ही लढाई उन्मेश पाटील आणि करण पवार यांची नसून तुमची लढाई करण्यासाठी ते उभे राहिले आहेत. तुम्ही त्यांना साथ देणार आहात की नाही हा विषय 4 तारखेला कळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल –
कुटुंब आणि पक्ष फोडण्याशिवाय तुम्ही काय केले? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा शिवसेना तुमच्यासोबत होती तेव्हा पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची वेळ आली नाही. मात्र, आज तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. आणि ज्यांना पक्षाने ज्यांना मोठे केले त्यांनाच तुम्ही फोडले. मात्र, ज्यांनी माणसे मोठी केलीत ते आमच्यासोबत आजही कायम आहेत.
महाराष्ट्र तुमचा पराभव करणार –
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता भाजप पुर्वीसारखा राहिलेला नाही. भाजपने महाराष्ट्रात गद्दारीचे जे राजकारण सुरू केले ते हिंदुत्व नाही. आजपर्यंत महाराष्ट्राने चाळीसपेक्षा अधिक जागा देऊन दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचवले. तुम्ही गद्दारी फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी नाही केली तर तुम्हाला भरघोस मत देणाऱ्या संपुर्ण महाराष्ट्राशी तुम्ही गद्दारी केलेली आहात. आणि म्हणून शत्रु कितीही बलवान असेल तेव्हा अनेक छोटी माणसे एकत्र येतात, तेव्हा त्या बलवानाचा पराभव निश्चित असतो आणि तो पराभव ह्या निवडणुकीत महाराष्ट्र तुम्हाला करून दाखवणार, अशा इशारा त्यांनी भाजपला दिला.
मोदींच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके –
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ज्या खिचडी घोटाळ्याबाबत तुम्ही आमच्यावर आरोप लावतात. मात्र, सर्वात मोठा घोटाळा तुम्ही पीएम केअर फंडात केला. त्याची का नाही चौकशी झाली ज्यावेळी गुजरामध्ये सार्वजनिक चिता पेटत होत्या. त्यावेळी महाराष्ट्रात आम्ही एकाही शवाची विटंबना न होता विधिप्रमाणे संस्कार केले आणि महाराष्ट्राने कोरोना काळात केलेले कार्य हे सर्वांनी पाहिले. तसेच मोदींच्या इंजिनला विकासाचे डब्बे लागले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र, त्या डब्यांना भ्रष्टाचाराची चाके लागले आहेत, त्याचे काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : “हा जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा एजंट मंगू….”, नाव न घेता जळगावच्या सभेत उन्मेश पाटलांची जोरदार टीका