मुंबई, 15 डिसेंबर : महानगर पालिका निवडणुकीच्या आधीच भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनाम देत आज सकाळी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय. दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश पार पडला.
तेजस्वी घोसाळकर यांची सोशल मीडियावर भावूक पोस्ट –
तेजस्वी घोसाळकर यांनी गेल्या काही महिन्यांपुर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. दरम्यान, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तेजस्वी घोसळकर यांनी भाजप पक्षप्रवेशाआधी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे, प्रामाणिकतेशी तडजोड नाही. मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय, असं सांगितलं.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काय म्हणाल्या? –
मुंबईत पक्षप्रवेश करताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, 2017 साली शिवसेना पक्षाकडून नगरसेविका म्हणून निवडून आले होते. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय कठीण असून पक्ष सोडताना मला खूप दुःख होतंय. पण मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करायचाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व विकासकामे होतील अशी माझी अपेक्षा आहे.
View this post on Instagram
तसेच माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या निघृण हत्या प्रकरणाचा सीबीआयकडून संथ गतीने सुरू असलेल्या तपासाला वेग मिळेल आणि मला न्याय मिळेल अशी मी मुख्यमंत्री तसेच भाजपकडून अपेक्षा व्यक्त करत असल्याचे तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. यासोबतच पक्ष जी जबाबदारी सोपवेल त्यापद्धतीने काम करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
तेजस्वी घोसाळकर यांचा थोडक्यात परिचय –
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 साली त्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक-1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तसेच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत.
अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर, भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. आज या चर्चांना पुर्णविराम मिळालाय.
तेजस्वी घोसाळकर यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय? –
मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला.
सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर-बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला.अभिषेकची निघृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे.
View this post on Instagram
आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे.
मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन.






