नाशिक, 16 एप्रिल : नाशिकमध्ये आयोजित केलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात राज्यसभा खासदार संजय राऊतांनी जोरदार टोलेबाजी करत भाजप तसेच शिंदेंच्या शिवेसेनेवर टीका केली. संजय राऊत म्हणाले की, नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं. नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण जर कोणी केले असेल तर ते वॉशिंग्टनमध्ये झाले. तुलसी गबार्ड हे नाव लक्षात ठेवा. तुलसी गबार्ड ही साधी बाई नाहीये. मोदीची बहिण आहे. मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात आणि मोदी ज्यावेळी अमेरिकेला गेले होते, त्यावेळी प्रयागराज येथील गंगाजलाचे कुंभ घेऊन त्यांनी तुलसी गबार्डसाठी घेऊन गेले होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी तुलसी गबार्डला ते सुपुर्द केले होते.
महाराष्ट्राच्या निकालाचं उत्तर जगाला मिळालं –
संजय राऊत पुढे म्हणाले की, तुलसी गबार्ड ही बाई अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख आहे. त्यांनी सांगितलं की, ईव्हीएम हे हायजॅक होतात आणि ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात. मोदींनी तिच्या हातात गंगाजल दिलंय, त्यामुळे ती खोटं बोलणार नाही आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात हे जेव्हा तुलसी गबार्ड सांगते वॉशिंग्टनमध्ये बसून, तेव्हा महाराष्ट्राचा निकाल अशापद्धतीने का लागला, याचं उत्तर जगाला मिळतं.
ते शिवसेनेचे खच्चीकरण करू शकत नाहीत –
मग आम्हाला वाटतं, गेल्या दहा वर्षांपासून का चाललंय. खरंतर, आजच्या या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी तुलसी गबार्डालच बोलवलं पाहिजे. पुढच्या वेळेला आपण त्यांना नक्की बोलवू, अशा खोचक शब्दात टिप्पणी करत अशा निकालांनी तुम्ही शिवसेनेचे अशापद्धतीने खच्चीकरण करू शकत नाहीत, असेही राऊत म्हणाले.