मुंबई – निवृत्त पोलीस कुटुंबांना पोलीस वसाहतीमध्ये राहण्यासाठी आकारला जाणारा दंड स्थगित/कमी करण्यात यावा. तसेच मुंबईत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी युवासेनाप्रमुख आणि शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. आज आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या.
आदित्य ठाकरेंच्या मागण्या काय –
आज युवासेनाप्रमुख आणि शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी आणलेल्या धोरणानुसार, मुंबईतील प्रत्येक घराला, ते अधिकृत असो वा अनधिकृत, त्यांचा अधिकार म्हणून पाणी देण्यात आले होते. परंतु, शिंदे सरकारने ह्या धोरणावर ‘स्थगिती’ दिली होती. यामुळे हे धोरण पुन्हा लागू करावे, जेणेकरून सर्व मुंबईकरांना त्याचा लाभ मिळू शकेल, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
तसेच निवृत्त पोलीस कुटुंबांना पोलीस वसाहतीमध्ये राहण्यासाठी आकारला जाणारा दंड स्थगित/कमी करण्यात यावा. तसेच मुंबईत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून द्यावीत. महाविकास आघाडी सरकारने नवीन पोलीस वसाहतींसाठी 600 रुपये कोटींची तरतूद केली होती. वरळी, माहीम, नायगाव, कुर्ला येथील वसाहतींची कामे मागील 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत. ती तातडीने सुरू करावीत, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यासोबतच कलेक्टरच्या जमिनी फ्रीहोल्ड करण्यासाठी प्रीमियम कमी करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी विनंतीसुद्धा आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. दरम्यान, यामुळे आदित्य ठाकरेंसोबत आमदार सचिन अहिर, आदी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
‘सुवर्ण खान्देश’चे प्रतिनिधी ईसा तडवी यांचा पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान