जळगाव/मुंबई, 2 डिसेंबर : केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला ट्रकचालकांकडून देशभरात तीव्र विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी ट्रकचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, या दुसऱ्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.
पेट्रोल-डिझेलची टंचाई –
नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या ट्रकचालकांच्या देशव्यापी संपाचा फटका पेट्रोल-डिझेलला बसला आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी संपाच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. त्याच वेळी संपात फूट पडली असली तरीही राज्यातील इतर ठिकाणी संप सुरूच आहे. सोमवारपासून ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपामुळे पेट्रोल-डिझेलचे टँकर न आल्याने पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
राज्यातील काही भागांत संप मागे –
ट्रकचालकांकडून पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसऱ्याच दिवशी फुट पडली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात विदर्भ आणि कोल्हापूरमधील ट्रक चालकांनी संप मागे घेतला असून राज्यातील इतर ठिकाणी संप सुरुच आहे. केंद्र सरकारकडून नवीन मोटार वाहन कायदा आणला जात आहे. या कायद्यास देशभरातील ट्रक चालकांकडून संप पुकारत विरोध केला जात आहे. दरम्यान, या संपात पहिल्या दिवशी राज्यातील ट्रकचालकही सहभागी झाले होते.