जळगाव, 2 जुलै: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून यंदाही भुसावळहून विशेष अनारक्षित ‘आषाढी रेल्वे’ चालविण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या विशेष रेल्वेला मंजुरी दिली असून, वारकऱ्यांसाठी हा प्रवास पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जळगाव, बुलढाणा तसेच परिसरातील भाविकांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे रवाना होईल. तर २५ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून भुसावळकडे परतीचा प्रवास करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे भुसावळ-पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने या विशेष रेल्वेस मंजुरी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ही विशेष अनारक्षित आषाढी रेल्वे रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून स्वखर्चाने चालविण्यात येणार असून, वारकरी व भाविकांना या रेल्वेतून पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या सुविधेचा जास्तीत जास्त वारकरी आणि भाविकांनी लाभ घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही खासदार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.






