चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 1 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 8 दिवस उलटल्यानंतर महायुतीतील सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी हा मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती –
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याबाबत राज्याला उत्सुकता लागली होती. दरम्यान, काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये बावनकुळे यांनी म्हटलंय की, राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
आजपासून पुढची प्रक्रिया कशी? –
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोस्टमधून जरी राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख समोर आली असली तरी नवा मुख्यमंत्री कोण? याबाबत अधिकृत घोषणा बाकी आहे. खरंतर, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळ ठरवण्याबाबत महायुतीच्या बैठका पार पडत आहेत. असे असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांची मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका जाहीर केली असल्याने मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच असणार हे स्पष्ठ झाले आहे. तसेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी अधिकृत नावाची घोषणा होण्याआधी भाजपचा विधिमंडळातील गटनेता ठरवला जाईल. यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक हे मुंबईत येतील. त्यानंतर भाजपकडून गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस अथवा दुसऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत जरी त्यांची भूमिका स्पष्ट केली असली तरी राज्यातील मंत्रीमंडळातील गृहमंत्रीपद तसेच उपमुख्यमंत्रीपदाबाबत त्यांची भूमिका समोर आलेली नाही.
या घडामोडी दरम्यान ते त्यांच्या दरे या गावी मुक्कामाला आहेत. असे असताना त्यांची प्रकृती ठीक नसल्याने तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचीही माहिती समोर आलेली आहे. दरम्यान, आज दुपारी अथवा सायंकाळपर्यंत ते ठाण्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाल्यानंतर जर सरकार बनविण्याबाबत तसेच मंत्रीमंडळात कोणाचा समावेश करावा, याबाबत बैठकीत जर त्यांनी सहभाग घेतला तर सत्तास्थापनेबाबतचा पुढील मार्ग लवकर मोकळा होई शकतो. अशातच 3 डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेतेपदाची देखील निवड केली जाणार आहे. यानंतर 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
हेही वाचा : जळगावात समर्थकांनी लावले ‘भावी उपमुख्यमंत्री’ म्हणून बॅनर; गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?