ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 13 जुलै : नुकताच सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या सेट म्हणजे राज्य पात्रता परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पाचोरा येथील संजिदा बानो शेख दादामिया या तरुणीने ही परिक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे संजिदा बानो या तरुणीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.
संजिदा बानो ही पाचोरा येथील एसएसएमएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. नुकताच सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या सेट परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तिने इंग्रजी या विषयात यश मिळवले. तिने एसएसएमएम महाविद्यालयातून एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे. एमएच्या दुसऱ्या वर्षाला असतानाचा तिने ही परिक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. या परिक्षेसाठी तिला प्राध्यापक डॉ. अतुल सुर्यवंशी आणि इतर शिक्षकांची मार्गदर्शन मिळाल्याचे तिने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले.

संस्थ्येचे चेअरमन संजय वाघ यांच्याकडून सत्कार –
संजिदा बानो हिने सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे वडील दादामिया शेख आणि त्यांचा परिवार यांचाही सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी व्ही.टी. जोशी, नाना देवरे, खलील देशमुख, भोला आप्पा चौधरी, जकिर शेख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
भविष्यातील स्वप्न काय?
संपूर्ण महाराष्ट्रातून यावर्षी सेट परीक्षेला 1 लाख 1 हजार 257 उमेदवार बसले होते. त्यापैकी फक्त 6 हजार 676 उमेदवार ही सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. म्हणजे एकूण आकडेवारी पाहता 6.69 % उमेदवार पास झाले आहेत. दरम्यान, संजिदा बानो हिला या सेट परिक्षेत 300 पैकी 194 गुण मिळाले. तर एमए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात तिला 88.19 टक्के गुण मिळाले आहेत. भविष्यात तिला नेट परीक्षेचीही तयारी करायची असून यासोबतच पीएचडी करायची आपले स्वप्न आहे, असे तिने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले.