मुंबई, 24 मार्च : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या शोदरम्यान एक कविता ऐकवली, त्यात त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर ताशेरे ओढले होते. दरम्यान, या गाण्यावरून मोठा वाद पेटला असून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही असं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय.
नेमकी बातमी काय? –
कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन असून विविध ठिकाणी त्याचे शो आयोजित केले जातात. अशातच ठाण्यातील एका हॉटेलात त्यांचा शो पार पडला असता, या शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. यामुळे कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादात आलाय. तर त्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक होत त्याच्या स्टुडिओची तोडफोड केलीय. तर दुसरीकडे पोलिसांनी कुणाल कामरावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. लवकरच पोलीस त्याला ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया –
प्रकाश सुर्वे, मुर्जित पटेल यांच्यासह चार आमदारांबरोबर मी चर्चा केली असून ते पुर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याविरोधात गुन्हा दाखल करतील. दरम्यान,एकनाथ शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं कोणी तयार करत असेल किंवा त्यांची बदनामी करत असेल तर आमचे कार्यकर्ते तसेच आमचे आमदार कधीही सहन करणार नाही, असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिलाय. यासोबतच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्याला भाड्याने घेतलेला कॉमेडियन म्हटलं आहे. शीतल म्हात्रे यांनी देखील याविरोधात कायदेशीर
..अन् शिवसैनिकांनी केली तोडफोड –
स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यावरून शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. या तोडफोड प्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना पहाटेच्या सुमारास खार पोलिसांनी ताब्यात घेतले असन आतापर्यंत 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात स्टुडिओमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे समजते.
राऊतांचा खोचक टोला –
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा वादात सापडल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असून शिवसैनिक त्याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’पोस्टद्वारे कुणाल कामराचे एकप्रकारे समर्थन केलंय. राऊतांनी ‘एक्स’ पोस्ट करत “कुनाल की कमाल! जय महाराष्ट्र!” असं म्हटलंय.
कोण आहे कुणाल कामरा? –
कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन आहे. याआधीही तो वादात सापडालाय. कुणाल पहिल्यांदा त्याच्या ‘शतप या कुणाल’ या शोमधून लोकप्रिय झाला होता. कुणाल कामराने 2020 साली सर्वोच्च न्यायालयाबाबत अनेक वादग्रस्त कमेंट केल्या होत्या. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दलही त्याने अपमानजनक वक्तव्य केलं होतं. दरम्यान, कामरा नेहमी हिंदुत्व आणि राष्ट्रवादावर भाष्य करत असतो, त्यामुळे तो नेहमीच वादात सापडतो.