मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने मागच्या आठवड्यात याबाबतचा लेख प्रकाशित करण्यात आला नव्हता. नवरात्रीनंतर पुन्हा आता हे लेख प्रकाशित केले जातील. या मालिकेतील हा सहावा लेख.
बुल्गानिन आणि निकिता ख्रुश्चेव यांची राजभवन भेट –
सोव्हिएत संघाचे पंतप्रधान निकोलाई बुल्गानिन आणि सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव निकिता ख्रुश्चेव यांनी दिनांक १८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर १९५५ या कालावधीत भारताचा दौरा केला होता. भारतात त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले होते. आपल्या भारत दौऱ्यात ते मुंबईलाही आले होते.
तत्कालीन मुंबई राज्याचे राज्यपाल डॉ. हरेकृष्ण महताब यांनी त्यांचे राजभवन येथे स्वागत केले होते. महाराष्ट्र राज्य तोवर अस्तित्वात आले नव्हते. ‘उत्कल केशरी’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. हरेकृष्ण महताब हे ओडिशा राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईच्या राज्यपाल पदावर झाली होती. मार्च १९५५ ते ऑक्टोबर १९५६ ते मुंबईचे राज्यपाल होते.
आपले आत्मचरित्र ‘व्हाइल सर्व्हिंग माय नेशन – रिकलेक्शन्स ऑफ अ काँग्रेसमन’ मध्ये डॉ. महताब यांनी बुल्गानिन व ख्रुश्चेव्ह यांच्या राजभवन भेटीबाबत लिहिले आहे:
“बुल्गानिन आणि निकिता ख्रुश्चेव हे माझे पाहुणे म्हणून मुंबईला आले होते. नाश्त्याच्या वेळी भारताच्या नियोजनाबद्दल आणि त्याच्या प्रगतीबद्दल आपले प्रामाणिक मत काय आहे, असे मी त्यांना विचारले. पाहुणे म्हणून औपचारिकतेपोटी ते भारताबद्दल चांगले बोलले होते. दोघांपैकी ख्रुश्चेव हे स्वभावाने मोकळे आणि उत्साही होते, त्याउलट बुल्गानिन हे शांत प्रकृतीचे होते. माझा प्रश्न ऐकताच ख्रुश्चेव यांनी लगेच टेबलावर मूठ आपटून विचारले – ‘तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे का भारताच्या नियोजनाबद्दल ?’
मी होकार दिल्यावर त्यांनी शेतावर जाण्याची इच्छा प्रकट केली. ख्रुश्चेव्ह यांनी स्वतः शेतात तसेच खाणीत काम केलेले होते! त्यांच्या सूचनेनुसार मी मुंबई – पुणे रस्त्यालगत असलेल्या एका शासकीय शेतावर त्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था केली. हे शेत उत्तम शेतांपैकी एक मानले जात होते.
ही भेट अनौपचारिक असल्यामुळे आम्ही तिघे – बुल्गानिन, ख्रुश्चेव आणि मी, त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत तेथे गेलो. परंतु पूर्वसूचना दिल्यामुळे तेथील अधिकारी वर्ग स्वागतासाठी अगोदरच सज्ज होता. गाड्या थांबताच अधिकारी नेहमीप्रमाणे हस्तांदोलन व ओळख करून देण्यासाठी रांगेत उभे झाले. ख्रुश्चेव मात्र हस्तांदोलन किंवा ओळखी करून देण्याच्या फंदात न पडता लगेच गाडीतून उतरले आणि थोड्या अंतरावर ठेवलेल्या ट्रॅक्टरच्या ताफ्याकडे गेले.
ते चक्क एका ट्रॅक्टरवर बसले आणि चालवण्याचा प्रयत्न केला, पण ट्रॅक्टर सुरु झाला नाही. मग ते उतरले आणि अधिकार्यांना विचारले की तुमच्यापैकी कोणी हा ट्रॅक्टर दुरुस्त करू शकेल का?, अधिकारी एकमेकांकडे पाहत राहिले; पण कुणीही उत्तर दिले नाही. ख्रुश्चेव यांनी स्वतःच काही मिनिटांत ट्रॅक्टर दुरुस्त केला आणि थोडा वेळ चालवला.
येताना मुठभर माती हातात घेऊन ते अधिकार्यांकडे आले आणि त्यांना विचारले – या मातीचा गुणधर्म काय आहे व ती कोणत्या पिकासाठी योग्य आहे, आपण सांगू शकाल का?, एकाही अधिकार्याकडे याचे उत्तर नव्हते. तेव्हा ते लगेच म्हटले – ‘चला, आपली भेट संपली, आता परत जाऊ या.’
माझ्याजवळ बसून ते म्हणाले – ‘तर हे आहे भारताचे नियोजन !
तुम्ही जबाबदारी अशा लोकांकडे सोपवली आहे की ज्यांना त्याबद्दल काहीही माहिती नाही. रशियात असे होत नाही. तिथे मंत्रीसुद्धा काही काळ शेतात, कारखान्यात किंवा खाणीत काम करतोच. भारतीय नियोजनातील दोष हा आहे की लोकांना आपले जीवन सुधारण्यासाठी कोणताही त्याग करावयाचा नाही. पाश्चात्य देश समृद्ध झाले कारण त्यांनी वसाहती देशांकडून संसाधने हिसकावली. रशियात मात्र लोकांना स्वतःच्या उन्नतीसाठी त्याग करण्याचे आवाहन केले जाते.
भारत दीर्घकाळ गुलामगिरीत होता आणि अनेक संकटांतून गेला, त्यामुळे कदाचित स्वातंत्र्यप्राप्तीनंतर थोडा आनंद उपभोगायची लोकांना इच्छा असणे स्वाभाविक आहे, असा युक्तिवाद मी करुन पाहिला.
त्यावर त्यांनी त्वरित उत्तर दिले – ‘मला भारतीय मनोवृत्ती माहीत आहे. जर भारतीय माणूस परलोकातील अज्ञात सुखासाठी उपवास करू शकतो, त्याग करू शकतो, तर स्वतःच्या आयुष्यात काही वर्षांत मिळणाऱ्या फळासाठी देखील, इच्छा असल्यास, तो सहज त्याग करू शकतो.
त्याग हा नियोजनातील मुख्य घटक आहे, आणि तो भारताच्या नियोजनात दिसत नाही. भारताचे नियोजन केवळ लोकांना खूश ठेवण्यासाठी आहे, त्यांचा खरा विकास साधण्यासाठी नाही. खरे सांगायचे झाल्यास तुमचे नेतेच त्यागावर विश्वास ठेवत नाहीत. ख्रुश्चेव्ह यांचे हे निरीक्षण मी पंतप्रधानांना कळवले. उत्तरात त्यांनी लिहिले की ख्रुश्चेव म्हणाले ते बरोबर आहे. पण ते स्वतः त्या परिस्थितीबाबत असहाय होते.”
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन, मुंबई)