धुळे, 19 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी नाशिकमधील पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई, वडील आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता धुळ्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, धुळे शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवीण मानसिंग गिरासे (वय 52), दीपा प्रवीण गिरासे (वय 44), मितेश प्रवीण गिरासे (वय 18) व सोहम प्रवीण गिरासे (वय 13) अशी चौघा मृतांची नावे आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते धुळ्यातील प्रमोद नगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितलं होतं. मात्र, मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसत होतं. प्रवीण गिरासे यांची बहीण या आज सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, तो त्यांनी उघडला असता चौघेही मृत अवस्थेमध्ये आढळून आले.
धुळ्यात घडलेल्या या घटनेचे हे दृष्य पाहुन त्यांच्यासह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. हा प्रकार समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एलसीबीबचे पीएसआय प्रकाश पाटील, हवालदार संतोष हिरे, प्रकाश सोनार, निलेश पोतदार, देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण कौठुळे, हवालदार चंद्रकांत नागरे, सुनील राठोड तसेच सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गिरासे, माजी नगरसेवक कमलेश देवरे, माजी नगरसेवक भगवान गवळी, प्रफुल्ल पाटील, अमित दुसाने यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी या चौघांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत