चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 6 मे : युवकांचा शेतीत मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला पाहिजे, यासाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे आग्रही असून त्यांनी कृषी क्षेत्राच्या माध्यमातून ‘तरूण शेतकरी’ मॉडेल उभं करणार असल्याचे जाहीर केले आहे. पाचोरा येथे आज पार पडलेल्या खरीप हंगामपुर्व आढावा व नियोजन सभेत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
ज्यांच्याकडे 10-20 एकर शेती आहे, असे तरूण देखील आजच्या स्थितीत केवळ लग्नासाठी मुंबई-पुण्याला दहा-वीस हजारांच्या नोकरीसाठी जाताएत. यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात शेतीत सहभाग वाढविण्यासाठी कृषी विभाग तसेच प्रगतशील तरूण शेतकऱ्यांच्या मदतीने नवीन संकल्पना राबवायची आहे. जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे घेऊन शेतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून युवकांचे मतपरिवर्तन करून शेतीतील सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करायचा असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
दरम्यान, जोपर्यंत युवक शेतीत सहभाग घेऊन शेतीशी संलग्न होणार नाही; तोपर्यंत खऱ्या अर्थांने आपल्या पुर्वजांना न्याय मिळवून देऊ शकत नाही. यामुळे येणाऱ्या काळात मतदारसंघात जास्तीत जास्त संख्येने युवकांचा शेतीत सहभाग वाढविण्यासाठी चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
कृषी क्षेत्राच्या माध्यमातून ‘तरूण शेतकरी’ मॉडेल उभं करणार –
महाराष्ट्रात पाचोरा-भडगाव तालुक्याला एक विकासाचे मॉडेल बनविण्याचा प्रयत्न करतोय अगदी त्याचप्रमाणे तालुक्यात कृषी क्षेत्राच्या माध्यमातून ‘तरूण शेतकरी’ मॉडेल उभारणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज जाहीर केले. दरम्यान, वाडी शेवाळे येथील सुनिल पाटील यांच्यासारख्या शेतीपद्धती करणाऱ्या आदर्श शेतकऱ्यांकडे पाहूनच माझ्या मनात ही संकल्पना आल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
हेही पाहा : शेतकऱ्यांनी आता व्यावसायिकदृष्ट्या शेती करणे गरजेचे – आमदार किशोर आप्पा पाटील