नागपूर – महायुतीच्या शपथविधी सोहळा परवा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या महाशपथविधी सोहळ्याची तयारी अत्यंत वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे निश्चित असलं तर अद्याप कुणाच्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. देशभरातील अनेक दिग्गज मान्यवरांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, यामध्ये नागपुरातील चक्क एका चहा विक्रेत्यालासुद्धा या शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे. हा चहावाला नेमका कोण आहे, हे जाणून घेऊयात.
गोपाल बावनकुळे असे या चहाविक्रेत्याचे नाव आहे. गोपाल बावनकुळे यांचा हा चहाचा स्टॉल भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानापासून जवळच आहे. मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणाबाबत गोपाल बावनकुळे म्हणाले की, त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून कालच फोन आला. एका चहावाल्याला शपथविधीचे निमंत्रण ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी उद्या सकाळी मुंबईसाठी रवाना होणार आहे. माझ्यासह माझी 4-5 लोकांची टीम स्वखर्चाने माझ्या कारने मुंबईला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी देवमाणूस –
अनेक ठिकाणी चहास्टॉलवर देवी देवतांचे फोटो लावलेले पाहायला मिळतात. मात्र, या ठिकाणी गोपाल बावनकुळे यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी देवमाणूस आहेत. माझ्यासाठी दैवत आहेत. तसेच माझे दुकान सुरू करायला साडेतीन-चार वर्षे झालेली आहेत. जेव्हा माझ्या चहाच्या दुकानाला 3-4 चार महिने झाले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस हे रामनगरमध्ये एका कार्यक्रमाला आले असताना एका लिंकने ते माझ्या दुकानात चहा प्यायला आले होते. तो क्षण मला आजही लक्षात आहे. मुख्यमंत्री बनल्यावरही मी तुझ्या दुकानावर चहा प्यायला येईन, असे ते सांगायचे, अशी माहिती गोपाळ बावनकुळे यांनी दिली.
मोफत चहा वाटणार –
देवेंद्र फडणवीस हे माझे दैवत असून येत्या 5 तारखेला त्यांचा शपथविधी झाल्यानंतर मी त्यादिवशी दुकान सुरू ठेऊन मोफत चहा वाटणार असल्याचेही गोपाल बावनकुळे यांनी सांगितले.
eknath shinde health update : एकनाथ शिंदे आजारी की नाराज?, गुलाबराव पाटलांनी सांगितली सर्व माहिती…