मुंबई – वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या खालच्या दुखापतीमुळे 2025 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. यामध्ये पुरुषांच्या निवड समितीने जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान दिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी रात्री उशिरा भारताचा अंतिम संघ जाहीर केला. यामध्ये बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान मिळाले आहे.
येत्या 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होत आहे. यासाठी याआधी जाहीर केलेल्या संघात 12 फेब्रुवारीपर्यंत अंतिम बदल करण्याची मुदत आयसीसीने सर्व संघांना दिली होती. यानुसार भारताने मंगळवारी रात्री उशिरा आपला अंतिम संघ जाहीर केला.
यामध्ये बुमराह आता ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याच्या जागी हर्षितला स्थान देण्यासह निवडकर्त्यांनी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यालाही संघात निवडले आहे. तसेच यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. गरज भासल्यास ते दुबईला रवाना होतील, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
2025 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
फलंदाज: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर
यष्टिरक्षक: लोकेश राहुल, ऋषभपंत
अष्टपैलूः हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर
फिरकीपटूः कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
वेगवान गोलंदाज: हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग