जळगाव, 20 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढला असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिना हा उन्हामुळे अत्यंत त्रासदायक ठरू शकतो. दरम्यान, उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. 20 एप्रिल रोजी राज्यासह जळगाव जिल्ह्याची हवामानाची स्थिती काय असेल? याबाबत अपडेट जाणून घेऊ.
खान्देशातील तापमान किती असणार? –
सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान 40 पार गेलं असून काल जळगावातील तापमान 42 अंशाच्या पार गेले. जळगाव जिल्ह्याचे तापमान आज आणि उद्या 40 अंश सेल्सियस इतके असणार आहे. तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे देखील तापमान अनुक्रमे 40 आणि 39 अंश सेल्सियस राहणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या मध्यान्हातच तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिएसवर गेला आहे. तापमानाचा पारा मे महिन्यात 45 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यात उष्णतेची लाट –
राज्यातील अनेक भागातील तापमान 36 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले जात आहे. राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर फिरणे टाळावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
उन्हापासून बचावासाठी ‘अशी’ घ्या काळजी –
- भरपूर पाणी प्या, तुम्हाला तहान लागण्यापूर्वीच पाणी प्या.
- फिकट रंगाचे सैल तसेच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा.
- ताक आणि मलईदार नारळ देखील निरोगी पर्याय आहेत म्हणून यांचे सेवन करा.
- उन्हाळ्यात साखर आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असलेले कोला आणि पॅकेज्ड ज्यूस टाळा.
- तुमच्या आहारात मुबलक फळे आणि भाजीपाला समाविष्ट करा. यामध्ये काकडी आणि टरबूज सारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नाचे सेवन करा.
- आवश्यकता असल्याशिवाय सकाळी 10:30 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळा.
- उन्हाळ्यात वर्कआऊट करणे सोपे नसते परंतु त्यामुळे स्टॅमिना वाढत असतो. यामुळे कडक उन्हात वर्कआऊट करू नका, सकाळी लवकर, संध्याकाळी उशिरा किंवा घरामध्ये वर्कआऊट करा.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिल्या टप्पा पडला पार, पाच मतदारसंघात झाले ‘इतके’ मतदान