मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलात कोणीच मुस्लीम नव्हते, असा दावा राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री, भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. मंत्री नितेश राणे यांच्या या विधानानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलातील मुस्लीम सरदारांची यादीच दिली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच ‘माननीय मंत्र्यांनी वाचावे असे…’ हे कॅप्शन देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलातील मुस्लीम सरदारांची यादी दिली आहे. यातील नावे पुढीलप्रमाणे –
छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत मुस्लीम सरदार –
१) सिद्दी हिलाल : घोडदळातील सेनापती सहाय्यक
२) सिद्दी वाहवाह: घोडदळातील सरदार
३) सिद्दी इब्राहिम : शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार
४) नूरखान वेग : स्वराज्याचा पहिला सरनोबत
५) मदारी मेहतर : महाराजांचा विश्वासू सेवक
६) काझी हैदर : महाराजांचा वकिल / सचिव
७) शमाखान : सरदार
८) सिद्दी अंबर वहाब : हवालदार
९) हुसेनखान मियाना लष्करात अधिकारी
१०) रूस्तमेजमान : महाराजांचा खास मित्र
११) दर्यासारंग: आरमाराचा पहिला सुभेदार
१२) इब्राहिमखान : आरमारातील अधिकारी
१३) दौलतखान : आरमार प्रमुख (सुभेदार)
१५) सुलतानखान: आरमाराचा सुभेदार
१६) दाऊतखान : आरमारातील सुभेदार
१७) इब्राहिमखान : तोफखान्याचा प्रमुख
१८) विजापूर व गोवळकोंड्यावरून स्वराज्यात आलेले ७०० पठाण : पायदळ व घोडदळात
१९) घोडदळातील चार पथके मोगली चाकी सोडून स्वराज्यात आली : पायदळ व घोडदळात
छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लीमांचे शत्रू नव्हते. ते शत्रू होते अन्यायाचे, अत्याचारी प्रवृत्तीचे! ज्या ज्या वेळी स्वकीयांनीच शिवाजी महाराजांवर तलवारी उपासल्या, तेव्हा ते वार आपल्या छातीवर झेलणारे वीर मुस्लीमच होते, हा इतिहास नाकारता येणार नाही! छत्रपतींनी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारलेले निधर्मी राज्य निर्माण केले होते. महाराजांचा लढा हा राष्ट्रीयत्वाचा होता!, असे त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही दिली समज –
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापन करताना कधीच जातींमध्ये किंवा समाजात भेद केला नाही. त्यांनी महाराष्ट्रात राहणारा जो मराठा माणूस आहे, त्या सगळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापन केली आहे. अलीकडच्या काळात ‘छावा’ चित्रपट आला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास नव्या पिढीसमोर आणला आहे. मी विधिमंडळातील दोन्ही बाजूच्या सन्मानयीय सदस्यांना सांगेन की, ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे, असा मुस्लीम समाज मोठ्याप्रमाणावर भारतात आहे. आपण जो इतिहास वाचला आहे, तो संशोधन करुन आणि माहिती गोळा करुन मांडण्यात आला आहे. त्यामध्ये लिहण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मुस्लीम लोक होते. शिवाजी महाराजांचा दारुगोळा कोण सांभाळत होतं? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.