यावल : महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे. प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये देण्याची महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतर या योजनेचा सरकारला प्रचंड लाभ झाला. ही योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. यामुळेच महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले, असेही बोलले जाते. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने ‘नववधू लाडकी भगिनी’ ही अभिनव योजना सुरू केली आहे.
काय आहे ‘नववधू लाडकी भगिनी’ योजना –
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने ही ‘नववधू लाडकी भगिनी’ योजना सुरू केली. साकळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नववधू लाडकी भगिनी’ या अभिनव योजनेला सुरुवात झाली. यामध्ये सर्व जाती-धर्मातील लग्न होऊन साकळी गावात येणाऱ्या नववधू सुनेला आणि गावातून जाणाऱ्या नववधू लेकीला त्यांच्या लग्नाच्या वेळी साकळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने एक प्रेशर कूकर भेट दिला जात आहे.
यामध्ये या योजनेच्या माध्यमातून नववधूला भेट देण्यासाठी तसेच गावाच्या नववधू लेकीच्या लग्नकार्यात जाऊन सरपंच हे आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रेशर कूकरची भेट नववधूच्या हाती सुपुर्द करीत आहेत.
योजना ग्रामपंचायत प्रशासनाच्या इतिहासात एक सुवर्णपान ठरणार –
महिलांच्या सन्मानार्थ आमच्या साकळी ग्रामपंचायतीच्या वतीने नव्याने ‘नववधू लाडकी भगिनी ‘ ही समाजहिताची योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना सुरू करणे माझ्यासाठी व माझ्या संपूर्ण सहकाऱ्यांसाठी एक भाग्याची व समाधानाची बाब ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या गावातील महिला-भगिनींचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभणार आहे. तसेच ही योजना ग्रामपंचायत प्रशासनाच्या इतिहासात एक सुवर्णपान ठरणार आहे, असे साकळीचे लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत –
साकळी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे परिसरात कौतुक केले जात आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून लाडक्या भगिनींसाठी अशा प्रकारची योजना सुरू करणारी साकळी ग्रामपंचायत ही जळगाव जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे, असे सांगण्यात आले.