जळगाव, 31 मार्च : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव रोडवर एका वाहतूक पोलिसाने ट्रकचालकाला अडवत त्याच्याकडून लाच घेतल्याचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पवन पाटील, चेतन सोनवणे तसेच गुलाब मनोरे असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपधीक्षक धनंजय येरूळे करत आहेत, अशी माहितीही डॉ. रेड्डी यांनी दिलीय.
नेमकी बातमी काय? –
वाहतूक पोलीस पवन पाटील हा ड्यूटीवर असताना त्याने ट्रक अडवून ट्रकचालकाकडे पैशांची मागणी केली. अशातच ट्रक ड्रायव्हर हा कमी पैसे देत असल्याचे दिसताच त्याने जास्त पैशांची मागणी केली. मात्र, ट्रक ड्रायव्हर आणि इतर व्यक्ती आम्ही रोज जात असल्याचे सांगत 50 रूपये देण्याचे सांगतो. दरम्यान, पवन पाटील याने “आमची इज्जत 50 रूपयाची आहे का?” असा प्रश्न करत किमान 100 रूपये तरी दे अशी मागणी केली. यानंतर काही क्षणानंतर ट्रक ड्रायव्हरकडून त्याने 50 रूपये घेत गाडी पुढे काढण्याचे सांगितले.
एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी केली कारवाई –
वाहतूक पोलिसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दरम्यान, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओची तात्काळ दखल घेतली आणि मोठी कारवाई केली. या कारवाईबाबत बोलताना एसपी डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आमच्यापर्यंत आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. तो व्हिडिओ पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील असून पाचोरा-भडगाव रोडवरील हा व्हिडिओ आहे.
View this post on Instagram
पाचोरा पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी निलंबित –
दरम्यान, त्या व्हिडिओत 50 रूपये घेताना दिसत असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव पवन पाटील असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच अजून दोन पोलीस कारवाई करताना दिसताएत. मात्र, त्यांची यामध्ये संशयास्पद भूमिका दिसून येत असल्याने त्यांना देखील निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
हेही पाहा : ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत