चाळीसगाव, 30 जुलै : तालुक्यातील खान्देश सुपुत्र तथा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीमुळे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. दरम्यान, त्यांनी कॅनडात केलेल्या कामगिरीमुळे देशासह खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा उंचावला आहे.
जागतिक स्तरावर सुवर्णपदक –
कॅनडात वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, ही स्पर्धा जागतिक स्तरावर पोलिस दलासाठी ऑलिम्पिक मानली जाते. या स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक (अँटी करप्शन) खात्याचे सहायक आयुक्त विजय चौधरी यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. विजय चौधरी यांनी 125 किलोग्रॅम वजनाच्या सुपर हेवीवेट गटातील कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरित जेसी साहोटा या मल्लास चीत करत सुवर्णपदक पटकावले आहे.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी –
विजय चौधरी यांचे चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी हे मुळ गाव असून त्यांनी आतापर्यंत 2014, 2015, 2016 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय मिळवला आहे. विजय चौधरी यांच्या विक्रमांची दखल घेत तत्कालीन राज्य सरकारने त्यांना पोलिस खात्यात थेट डीवायएसपी पदी नियुक्ती दिली होती. दरम्यान,विजय चौधरी सध्या पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक (अँटी करप्शन) खात्याच्या सहायक आयुक्तपदी कार्यरत आहेत.