बीड, 17 जानेवारी : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्हा गुन्हेगारीवरून चर्चेत आला असताना आणखी एक प्रकरण समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. अजय भोसले आणि भरत भोसले असं या सख्ख्या भावांचे नाव असून त्यांची हत्या जमावसह नातेवाईकांनीच केली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
निर्घृणपणे दोघांची हत्या –
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ पारधी समाजातील असून ते बीड-नगर हद्दी वरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे आहेत. अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकासोबत जुना वाद होता. दरम्यान, या वादातून काल 16 जानेवारीच्या रात्री निर्घृणपणे या दोघांची हत्या करण्यात आली. हातवळण या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या करण्यात आली असून दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
कुटुंबियांचा आक्रोश –
मारहाण आणि खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्याप समजले नसून आष्टी ग्रामीण रूग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे. यावेळी मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिलाय की नाही, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय.
हेही वाचा : Crime News : चोपडा शहर पोलिसांकडून गांजा तस्करी कउपस्थित केला जातोयरणाऱ्या दोन टोळ्यांवर कारवाई