नाशिक, 23 जानेवारी : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. आमचा ‘भाजपमुक्त’ श्रीरामचा नारा आहे, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. ठाकरे गटाच्या नाशिकमधील राज्यव्यापी मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान, या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? –
नाशिकमधील राज्यव्यापी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवराय जन्माला आले नसते, तर राम मंदिर झाले नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अयोध्येला गेले आहेत. त्यापूर्वी कधीही ते अयोध्येला गेले नव्हते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामाचे मुखवटे घालून रावण फिरत होते. रामांबरोबर मोदींची तुलना करण्यात आली होती.
आमचा ‘भाजपमुक्त’ श्रीरामचा नारा –
आमचा ‘भाजपमुक्त’ श्रीरामचा नारा आहे, असा घणाघात त्यांनी भाजपवर लगावला आहे. तसेच आपल्याला वालीचा वध करावा लागेल कारण त्यांनी आपली शिवसेना पळवली आहे. ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या हक्काची शिवसेना पळवली, त्यांचा आम्ही राजकीय वध केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी टीका देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार –
रावणाच्या लंकेचे दहन कोणी केले हे देखील माहिती आहे. रावणाच्या अहंकारामुळे त्यांचे राज्य गेले. तसे राज्यकर्त्यांच्या अहंकारामुळे त्यांचे राज्य गेले. जनतेचे हित ओळखून राज्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून काम केले पाहिजे. ‘जो राम का नही, ओ किसका नही’ असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर केला आहे. तसेच त्यांना प्रभू रामावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा; म्हणाले, ……महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही!