मुंबई, 27 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस होता. आजच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर निशाणा साधला. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
राज्यातील शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. ते माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना देखील आणा आणि महिला-पुरुष भेदभाव करू नका, असा सल्ला ठाकरे यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून सरकारवर टीका –
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यात सरासरी 9 शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या जानेवारीपासून राज्यात 1046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. 10 हजार 22 कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही. पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जात पंचतारांकित शेती करतो. विशेषत: अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करा –
राज्यात सध्या चित्रविचित्र गोष्टी सुरू असून त्यामुळे डबल इंजिन सरकार आले आहे. कसेबसे एनडीएचे सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आले. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी 2 लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती. त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची देखील मागणी केली आहे.
हेही वाचा : धुळ्यात नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, काय आहे संपुर्ण बातमी?