चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. या दरम्यान, एकीकडे हिवाळ्याच्या थंडीतही राजकीय वातावरण तापत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी एक पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी दोघांमध्ये 7 मिनिटांची चर्चाही झाली. यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत सचिन अहिर यांनी सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट ही नियोजित नव्हती. ही एक सदिच्छा भेट होती. तसेच ती राजकीय संस्कृती दर्शवते. विरोधाला विरोध न करता पदाला मान देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ निघत नाही. राजकारणात अशा भेटी गाठी होत राहिल्या पाहिजेत. त्यामुळे राजकीय कटुता निर्माण होत नाही, असे आमदार सचिन अहिर म्हणाले.
दरम्यान, एकीकडे टोकाचे विरोध असताना राजकीय संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? अशा अनेक प्रश्नांवर राजकीय चर्चा सुरू झाल्या.