पारोळा, 4 फेब्रुवारी : पारोळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंडर ग्राउंड असलेली 14 इंची पाईपलाईन अचानक फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग सहावर ॲपोलो टायर दुकान येथे हा प्रकार आज शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला.
अचानक ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी भर रस्त्यावरून वाहून गेले. तसेच यामुळे यावेळी वाहतूकही ठप्प पडल्याने वाहतूक कक्षाच्या पोलिसांना पाचारण करावे लागले. या पाईपलाईन फुटीचे कारण समजून आले नसले तरी नगरपालिका पाणीपुरवठा विभागाची एकच धावपळ उडाली होती.
एक तास पाणी वाया –
मिळालेल्या माहितीनुसार, अंडर ग्राउंड असलेली 14 इंची पाईपलाईन अचानक फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. तब्बल पाईपलाईन मधून एक तास पाणी सुरू होते. विशेष म्हणजे पाण्याचा फोर्स इतका जोरात होता की आजूबाजूचा परिसरात पाण्याचे तळे साचले होते. यावेळी अर्जुन पाटील यांच्या दुकानात पाणीच पाणी झाल्याने त्यांना संपूर्ण माल बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले. यावेळी मोठ्या प्रमाणात बघणाऱ्यांनी गर्दी केली होती.
पाणी पुरवठा विलंबाने होणार
दरम्यान, शहरात अगोदरच 12 झोनमध्ये 12 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात आता ही पाईपलाईन फुटल्याने पुढील झोनला किमान एक दिवस तरी विलंब होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शहरात संपूर्ण पाईपलाईन ही ब्रिटिश कालीन आहे. ती जीर्ण झाल्याने सदर घटना घडली आहे. तरी राज्य शासनाच्या 54 कोटी रूपयांच्या निधीतून सर्व पाईपलाईन बदल होणार असल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.