संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 10 सप्टेंबर : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2022-2023 अटल भुजल योजना व भुजल व विकास यंत्रणा मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालंय.
उंदीरखेडे गावाने पटकावला द्वितीय क्रमांक –
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत उंदीरखेडे गावाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटवकल्याने त्यांना बांधकाम मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भूसे तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 30 लाख रूपयांचा धनादेश, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी पारितोषिक स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी मुकेश हिंमत साळुंखे, उंदीरखेडे गावाचे सरपंच गणेश दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कैलास निकम, पाणीपुरवठा कर्मचारी दिलीप दिनकर पाटील, लिपिक नवनाथ भालेराव पाटील आदी उपस्थित होते.
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन –
लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे तसेच राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीसाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. त्याकरीता ग्रामस्तरावर जलअंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरुन काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?