चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 3 एप्रिल : “भाजपमध्ये विकासाच्या ऐवजी विनाशाची, बदलाच्या ऐवजी बदलाची भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजवली जात आहे. मान सन्मान नको मात्र स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी कार्यकर्ता म्हणून ठाकरे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” असे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले उन्मेष पाटील? –
माजी खासदार उन्मेष पाटील त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत म्हणाले की, “बदला घेण्यासाठी नाही तर बदल करण्यासाठी मी या पदाचा वापर केला. बदल्याच्या राजकारण न स्विकारता मी विकासासाठी भूमिका घेतली. मी तिकिट कापल्यावरून नाराज नसून यानंतर ज्या पद्धतीने अवहेलना केली गेली तिथे आमचा स्वाभिमान दुखावला जात होता. माझी लढाई ही आत्मसन्मानासाठी आहे. अवहेलना झाल्यामुळे मी वेगळी भूमिका घेतली असून मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही. बदल्याचे राजकारण मनाला वेदना देणारे होते,” असे त्यांनी सांगितले.
म्हणून वेगळी भूमिका घेतली –
उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, “ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची लढाई आहे. खानदेशाच्या विकासाच्या बाजूने पुढे नेणारी ही लढाई आहे. मला उमेदवारी मिळालेली नाही म्हणून ही भूमिका घेतलेली नाही.” भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही आणि म्हणून अवहेलना होत असल्याने वेगळी भूमिका घेतली असल्याचे उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.