संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 27 फेब्रुवारी : पारोळा शहरातील पार्श्वनाथ मंदिराजवळील चौकात सकल जैन समाजातर्फे आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांच्या विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आचार्यश्रींचे शिष्य बाल ब्रम्हचारी विपुल भय्या ब्रम्हचारीणि काजल दीदी, अजित जैन, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, आरएसएसचे मुकेश चोरडिया व अनेक समाज बांधवांनी आचार्य श्रींविषयी मनोगत व्यक्त केले.
आचार्य विद्यासागरजी महाराज हे वर्तमान काळातील ईश्वरीय अवतार होते. त्यांच्या समाधिस्त होण्याने अध्यत्मिक, धार्मिक व सामाजिक जगताची मोठी हानी झाली असून त्यांची पोकळी भरून काढणे अशक्य आहे. आचार्य विद्यासागरजी महाराजांसारखे संत हजारो वर्षातच कधीतरी अवतार घेतात. आचार्य विद्यासागरजी महाराज अध्यात्मिक जगताचा सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. त्यांच्या दर्शनाने अद्भुत सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असे. ते केवळ जैन संत नव्हते तर ते जन संत होते. त्यांनी धर्मासोबतच देश, राष्ट्र व जीवदया तसेच शिक्षण क्षेत्रातही मोठे कार्य केले. अशा अनेकविध भावना यावेळी उपस्थित विविध मान्यवर व समाजबांधवांनी व्यक्त केल्या.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जैन युवक मंडळातर्फे करण्यात आले होते. युवा कार्यकर्ते अक्षय जैन, प्रीतेश जैन, सागर जैन, सिद्धेश जैन, तेजकुमार जैन, अतुल जैन,निखिल जैन, धवल जैन डॉ. ईशान जैन व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांसह समाजबांधवांनी आचार्य भगवंत विद्यासागरजी विनयांजली सभेत भावपूर्ण विनयांजली अर्पण केली.
हेही वाचा : शेतकऱ्यांचे अवकाळीने पावसाने नुकसान, पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी