ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 14 मे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काल 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 60 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या नेतृत्वात पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली.
मतदानाची आकडेवारी –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 60 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 3 लाख 19 हजार 751 इतकी आहे. यापैकी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 1 लाख 91 हजार 844 मतदारांनी मतदान केले. तर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी एकूण 60 टक्के इतकी आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी पाचोरा-भडगाव या दोनही तालुक्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.