चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 13 मे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आज 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार या तीन मतदारसंघाचा देखील समावेश आहे. दरम्यान, मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून महायुती वा महाविकास आघाडीतील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ –
जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप उमेदवार स्मिता वाघ ह्या निवडणूक लढवत असून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, जळगावात मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली असून जळगाव लोकसभा मतदारसंघात नेमका कौल कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठे आव्हान –
यंदाची जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक विशेष ठरत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली. तर दुसरीकडे उन्मेश पाटील यांनी त्यांचे समर्थक करण पवार यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले. गेल्या महिनाभरापासून प्रचार सुरू असताना महायुती व महाविकास आघाडीतील मंत्री-आमदार तसेच पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान, स्मिता वाघ यांना निवडून आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीतील सहा आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उन्मेश पाटील यांनी प्रवेश करत एकप्रकारे सत्तेला आव्हान दिले. दरम्यान, उन्मेश पाटील यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या करण पवार यांना निवडून आणण्यासाठी उन्मेश पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान मानले जात आहे.
खान्देशातील मतदारसंघातील लढती –
- जळगाव लोकसभा मतदारसंघ –
स्मिता वाघ (भाजप, महायुती) विरूद्ध करण पवार ( शिवसेना (उबाठा), महाविकास आघाडी) - रावेर लोकसभा मतदारसंघ –
रक्षा खडसे (भाजप, महायुती) विरूद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी, महाविकास आघाडी) - नंदुरबार लोकसभा मतदारसंघ –
हिना गावीत (भाजप, महायुती) विरूद्ध गोवाल पाडवी (काँग्रेस, महाविकास आघाडी)
हेही वाचा : स्मिता वाघ की करण पवार, कोण मारणार बाजी? वाचा, स्पेशल रिपोर्ट