ईसा तडवा, प्रतिनिधी
पाचोरा, 17 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाचा डावा कालवा फुटल्याने पाणीचे आवर्तन बंद करण्याच्या प्रयत्नात दरवाजे नादुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून या घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
तालुका काँग्रेसने म्हटल्यानुसार, हिवरा मध्यम प्रकल्पात पाणीसाठा पुरेसा नसतांना देखील उजवा आणि डाव्या कालव्याच्या पाटचारीमध्ये घाईघाईत वरिष्ठ अधिकऱ्यांना चुकीच्या पाणी साठ्याची माहिती देऊन पाणी सोडण्यात आले. या पाण्याचे नियोजन करण्यात आले नव्हते. त्यातच पाणीसाठा कमी शिल्लक राहिलेने पाण्याचा दाब कमी होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचू शकले नाही.
यातच काल रात्री अचानक धरणाच्या बाजुला असलेल्या डाव्या कालवा फुटल्याने ग्रामस्थांनी प्रकल्पातील जबाबदार कर्मचारी यांना तातडीची सुचना केली. यावरुन सदर कर्मचारी यांनी दरवाजे बंद करण्याऐवजी उघडण्याची प्रक्रिया झाली आणि पाण्याचा प्रवाह जोरात सुरू झाल्यानंतर लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, या ही घटना घडत असताना लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी नॉटरीचबल होते. काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना खडकदेवळा ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिली असता त्यांनी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना कळवले. दरम्यान, अहिरे यांनी सांगितले असता नायब तहसिलदार बी. डी. पाटील, तलाठी बागुल सह मॅकेनिकल व पथक रवाना करण्यात आली.
नवीन गेट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असुन याचे ऑडिट व्हावे व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रांताधिकारी भुषण अहिरे यांच्याकडे काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
हेही वाचा : भाजप, ठाकरे गटाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?